World Pharmacist Day 2024:- FIP म्हणजेच इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनने 2009 मध्ये जागतिक फार्मासिस्ट दिवसाची स्थापना केली. या संस्थेची स्थापना 25 सप्टेंबर 1912 मध्ये झाली आणि 2009 पासून याच दिवसापासून जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात सिरी फोर्ट ऑडिटोरियम, नवी दिल्ली येथे 2013 मध्ये पहिल्यांदा जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला होता.
दरवर्षी हा दिवस खास करण्यासाठी FIP एक थीम निवडते. यंदाची म्हणजेच 2024 ची थीम “Meeting Global Health Needs” अशी ठरवण्यात आली आहे. ही थीम जागतिक आरोग्य प्रणालीमध्ये फार्मासिस्टची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते.
फार्मासिस्टचे काम फक्त लोकांना औषध देणे हे नसून त्यांचे आरोग्य प्रणालीत एक महत्त्वाचे स्थान आहे. ते रुग्णांना फक्त औषध देत नाहीत तर त्यांच्या आरोग्यविषयक योग्य माहिती देणे, औषधांचा योग्य वापर करण्याबाबत जागरूक करणे आणि आरोग्य शिक्षण देणे हेही काम करतात. जागतिक आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी Pharmacist चे महत्त्वाचे योगदान असते. चला तर मग जाणून घेऊया Pharmacist बद्दल काही माहिती.
Covid 19 मधील Pharmacist ची भूमिका
Corona काळ आला आणि एका डोळ्याला न दिसणाऱ्या विषाणूने थैमान घातले. या काळातच एका Pharmacist चे काम किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित झाले. यात त्यांनी फक्त लसीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली नाही तर या अश्या महामारीच्या काळात औषधांचा पुरवठा व्यवस्थित होईल याचीही काळजी घेतली.
World Pharmacist Day साजरा करण्याचे कारण
Pharmacist Day आपल्याला आठवण करून देतो की एक Pharmacist फक्त औषध वितरण करत नाही तर आरोग्य विभागात एक महत्त्वाची भूमिका देखील बजावतो. Pharmacist च्या योगदानाकडे, त्यांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या या कार्याचे कौतुक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
आपण सर्वांनी निरोगी आणि सुदृढ जीवन जगावे यासाठी यांची महत्त्वाची भूमिका असते. याचाच मान ठेवून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.
भारतातील फार्मसी शिक्षणाचा इतिहास
देशातील पहिले फार्मासिस्ट मानले जाणारे महादेव लाल श्रॉफ यांना ‘भारतातील फार्मसी शिक्षणाचे जनक’ म्हणून ओळखले जाते.
आशियातील पहिले फार्मसी कॉलेज 1842 मध्ये गोव्यात पोर्तुगीजांनी स्थापन केले परंतु श्रॉफ यांनीच 1932 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठांतर्गत तीन वर्षांचा बी.फार्म अभ्यासक्रम सुरू केला.
1937 मध्ये याच विद्यापीठात कॉलेज ऑफ फार्मसीचीही स्थापना झाली. त्यानंतर BITS पिलानी आणि सागर विद्यापीठ यांसारख्या संस्थांनी त्याचा पाठपुरावा केला.
पुढे केरळमध्ये 1967 मध्ये त्रिवेंद्रम मेडिकल कॉलेजमध्ये बी.फार्म कोर्स सुरू झाला त्यात 25 विद्यार्थ्यांचा समावेश होता. तत्कालीन प्राचार्य डॉ. एम थंगवेलू यांच्या पुढाकारामुळे आज KUHAS म्हणजेच केरळ युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस अंतर्गत 40 हून अधिक महाविद्यालये B.Pharm, M.Pharm आणि Pharm.D प्रोग्राम्स देतात. अनेक संस्था दोन वर्षांचा डी.फार्म कोर्स देखील देतात.
बी.फॉर्म अभ्यासक्रम
B.Pharm अभ्यासक्रम चार वर्षांचा असतो ज्यामध्ये शरीरशास्त्र, बायोकेमिस्ट्री आणि मायक्रोबायोलॉजी हे विषय पहिल्या वर्षात समाविष्ट केले जातात. पुढील तीन वर्षांत विद्यार्थी फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी, फार्माकॉग्नोसी, डिस्पेंसिंग फार्मसी, फार्मास्युटिक्स, मेडिसिनल केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक फार्मसी या विषयांचा अभ्यास करतात.
फार्मासिस्ट आणि औषध संशोधन
औषध संशोधनासाठी फार्माकोग्नोसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी आणि फार्मास्युटिक्समध्ये तज्ज्ञ असणे आवश्यक असते. औषधांचे रेणू ओळखणे, मूल्यमापन करणे आणि संश्लेषण करणे यासाठी फार्मासिस्ट जबाबदार असतात. संशोधनातील पुढील महत्त्वाची पायरी म्हणजे मानवी शरीरावरील पदार्थांचे औषधी प्रभाव शोधणे ही असते.
या संशोधनात उंदीर, ससे आणि कुत्रे यांसारख्या प्राण्यांना औषध देऊन औषधाची परिणामकारकता तपासतात आणि ज्यांच्या उतींची माणसांशी तुलना करतात.
औषध निर्मिती
एकदा औषधाने संशोधनाचा टप्पा पार केला की त्याच्या निर्मितीसाठी फार्मासिस्ट जबाबदार असतात. ही औषधे विविध स्वरूपात तयार केली जातात. जसे गोळ्या, तोंडी द्रव, कॅप्सूल, ड्रॉप्स, इनहेलर, मलम, सपोसिटरीज, पावडर, इमल्शन, लोशन आणि इंजेक्शन. आज AI औषध निर्मितीमध्ये देखील लागू केले जात आहे.
औषधांच्या क्लिनिकल चाचण्या
नवीन औषधांच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये डॉक्टर, फार्मासिस्ट आणि औषध निर्माण करणारी कंपनी यांच्यातील सहकार्याचा समावेश असतो. ज्या रोगावर औषध शोधले गेले आहे त्या रोगाने ग्रस्त रुग्णांवर केलेल्या चाचण्या, दुष्परिणाम किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया या चाचणीतून शोधण्यास मदत मिळते.
क्लिनिकल चाचण्यांचे चारही टप्पे पूर्ण केल्यावर कंपनीने सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून मंजुरीसाठी अर्ज करणे आवश्यक असते. त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच औषध तयार करता येते.