World Rhino Day :- गेंड्याच्या संरक्षणासाठी २२ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय गेंडा दिवस साजरा केला जातो. गेंड्यांबाबत जनजागृती निर्माण करणे, गेंड्याची शिकार थांबवण्यासाठी आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक गेंडा दिवस (world Rhino Day)साजरा केला जातो. गेंड्यांचे पर्यावरणातील महत्त्व अधोरेखित करण्याचा देखील या मागचा हेतू आहे.
गेंड्याबद्दल थोडी माहिती (Information about Rhino)
गेंडा (Rhino) हा प्राणी विषम खुरी गणातील असून त्याला तीन खुर असतात. साठ दशलक्ष वर्षांपूर्वी गेंड्याची पृथ्वीवर उत्क्रांती झाल्याचे जीवाश्म शास्त्राच्या नोंदीवरून समजते. गेंड्याची त्वचा घड्या असलेली आणि जाड असते. त्याच्या कातडीवर तीन घड्या पडलेल्या दिसतात त्यामुळे त्याची शरीररचना चिलखतासारखी भासते. नाकावरील शिंग हे या प्राण्याचे वैशिष्ट्य आहे.
गेंड्याच्या काही जाती एकशिंगी तर काही दोन शिंगी असतात. दिसायला गेंड्याचे शिंग हाडाचे दिसत असले तरीही ते हाडापासून बनलेले नसते तर तो केसांचा गुच्छ असतो ज्याचे रूपांतर शिंगात झालेले असते. कॅरोटीन तंतू पासून बनलेले हे शिंग वरुन भरीव वाटत असले तरीही या तंतुंनी घट्ट बनलेले असते.
गेंडा (Rhino) हा शाकाहारी वर्गात मोडणारा प्राणी आहे. याच्या मुख्य प्रजाती या गवत खातात त्यामुळे हे चरताना सहज आढळून येतात. तर यातील काही प्रजाती झाडाची कोवळी पाने, छोटी पिकलेली फळे, फांद्या आणि छोटी झुडपे खातात. तर पाणथळ जागी निवास करणारे गेंडे जलकंद आणि पाणवनस्पती खातात.
नर गेंडे एकट्याने राहणे पसंद करतात तर मादी गेंडे पिल्ले मोठी होईपर्यंत त्यांचे संरक्षण आणि संगोपन करत पिल्लांसोबत राहतात. जर गेंड्याच्या प्रजातीबद्दल बोलायचे झाले तर संपूर्ण जगात आज गेंड्याच्या फक्त पाच प्रजाती शिल्लक आहेत.
गेंड्याच्या शिकारीची मुख्य कारणे
गेंड्याच्या शिंगासाठी त्याची अवैध शिकार केली जाते. प्रामुख्याने चिनी औषधांमध्ये गेंड्याच्या शिंगाचा वापर केला जातो. तसेच काही अंधश्रध्देमुळे म्हणजेच गेंड्याचे शिंग जवळ बाळगल्याने आर्थिक समृध्दी येते अश्या समजुतीमुळे फक्त वीतभर शिंगासाठी बऱ्याच गेंड्यांची शिकार केली जाते.
चीन आणि व्हिएतनाम हे दोन देश गेंड्याच्या अवैध शिकारीसाठी कुप्रसिद्ध आहेत. पूर्वी नेपाळमध्ये दुष्ट शक्तींपासून बचाव होण्यासाठी आणि पूजेसाठी गेंड्याच्या शिंगाचा वापर दारावर टांगण्यासाठी केला जात असे पण तेथील वन्य जीव कायद्यानुसार आता गेंड्याच्या शिंगाच्या खरेदी – विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
जागतिक गेंडा दिवसाचा इतिहास (History Of World Rhino Day)
1990 च्या दशकात आफ्रिकेतील गेंड्यांच्या लोकसंख्येच्या संकटाला प्रतिसाद म्हणून जागतिक गेंडा दिनाचा इतिहास सुरू झाला. 2010 पर्यंत, फक्त 30,000 गेंडे उरले होते ज्यामुळे संरक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दक्षिण आफ्रिकेतील जागतिक वन्यजीव निधीने जागरुकता पसरवण्यासाठी जागतिक गेंडा दिवस तयार करून कारवाई केली. 2011 मध्ये झिम्बाब्वे येथील लिसा जेन कॅम्पबेलने हा दिवस यशस्वी करण्यासाठी सहकारी गेंडा समर्थक रिशजासोबत काम केले. तेव्हापासून जगभरातील लोकांनी 22 सप्टेंबर रोजी जागतिक गेंडा दिवस साजरा केला. या लुप्तप्राय प्राण्यांची शिकार आणि त्यांचा अधिवास नष्ट होण्यापासून संरक्षण करण्याच्या तातडीच्या गरजेवर लक्ष केंद्रित करून हा दिवस जागतिक गेंडा दिवस म्हणून आरक्षित करण्यात आला.
पांढरा, काळा, ग्रेटर वन-हॉर्न, जावन आणि सुमात्रन गेंडा अश्या पाचही गेंड्याच्या प्रजातीच्या संवर्धनावर केंद्रित करण्यात आला आहे.
जागतिक गेंडा दिवसाचे महत्त्व (Importance of World Rhino Day 2024)
जागतिक गेंडा दिवस गेंड्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांबद्दल जागतिक जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
- या दिवशी गेंड्याच्या संरक्षणाची गरज आणि लुप्त होणाऱ्या प्रजातींचे महत्त्व अधोरेखित केले जाते.
- विविध गटातील सहकार्य वाढवून गेंड्याच्या संरक्षणासाठी खाजगी संस्था तसेच सरकारी यंत्रणांना एकत्र येऊन काम करण्यास प्रोत्साहन देते.
- लोकांमध्ये गेंड्या विषयी जनजागृती निर्माण करणे, गेंड्याच्या अवैध शिकारीला आळा घालण्यासाठी तातडीच्या कारवाईसाठी आवाहन केले जाते.
गेंड्याच्या संवर्धनात येणाऱ्या अडचणी
गेंड्यांच्या संवर्धनाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. गेंड्याच्या शिंगांच्या अवैध मागणीमुळे शिकार करणे हा सर्वात मोठा धोका आहे. अधिवास नष्ट होणे ही आणखी एक समस्या आहे कारण शेती आणि विकास यासारख्या मानवी क्रियाकलापांमुळे गेंडे जिथे राहतात त्या नैसर्गिक जागा कमी होत आहेत. हवामानातील बदलामुळे देखील त्यांच्या परिसंस्थेवरही परिणाम होत आहेत ज्यामुळे गेंड्याचे जगणे कठीण होत आहे.
आणखी एक मोठे आव्हान म्हणजे अवैध वन्यजीव व्यापार, जो अवैध शिकारीला चालना देत आहे. याचा सामना करण्यासाठी जागतिक सहकार्य आणि मजबूत कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. प्रयत्न करूनही गेंड्यांची लोकसंख्या अजूनही धोक्यात आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी सतत कार्यवाही करणे आवश्यक आहे.
भारतीय गेंडा आढळणारी प्रमुख ठिकाणे
- एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेले आसाम मधील काझिरंगा नॅशनल पार्क आणि उत्तर प्रदेश मधील दुधवा नॅशनल पार्क
- पोबिटोरा वन्यजीव अभयारण्य, आसाम
- जंगलात मुक्त विहार करणारे गेंडे पाहण्यासाठी पश्चिम बंगाल मधील जलदापारा नॅशनल पार्क
- गेंड्याचे घर आणि युनोस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले आसाम येथील मानस राष्ट्रीय उद्यान