संभाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण दोन महिन्यानंतर
बेळगाव—belgavkar—belgaum : अनगोळमध्ये उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण दोन महिन्यानंतर करण्यात येईल. अजून काम शिल्लक आहे, घाई करण्यात येणार नाही, असे सांगत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी मूर्ती लोकार्पण वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वांना विश्वासात घेऊन अनावरण समारंभ
महापालिकेने 5 जानेवारी रोजी महापौर आणि उपमहापौरांच्या तसेच मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत संभाजी महाराज मूर्ती अनावरण सोहळा आयोजित केला आहे. तर गुरुवारी तणावातच संभाजी महाराज मूर्ती वास्तुशांती कार्यक्रम महापौर आणि उपमहापौरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
याप्रकरणी शुक्रवारी जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, घडल्या प्रकाराला जातीय रंग देण्याची आवश्यकता नाही. संभाजी महाराज मूर्ती आणि चौथऱ्याचे कामकाज पूर्ण होण्यासाठी अद्याप दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. कामकाज सरकारी निधीतून करण्यात आले असून सर्वांना विश्वासात घेऊन अनावरण समारंभ केला जाईल.
या कार्यक्रमाच्या आमंत्रणपत्रिकेत सर्व शिष्टाचार पाळले जातील आणि योग्य पद्धतीने नावे समाविष्ट केली जातील. याला जातीय रंग देण्याची गरज नाही. लोकांनी संयम ठेवावा, असे सांगितले. संभाजी महाराज मूर्ती अनावरणासाठी कोणताही वाद निर्माण होणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Unveiling of the statue of Sambhaji Maharaj Angol Belgaum
Unveiling of the statue of Sambhaji Maharaj Angol Belgaum