दोन भावांनी उभा केला करोडो रुपयाचा शेतकरी ब्रॅंड – two brothers india

By Pratiksha Majgaonkar

Updated on:

Two Brothers India
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Two Brothers India Brand Story : पूर्वी लोक घरची शेती असली की पिढ्यानपिढ्या तीच पुढे नेत होते. कालांतराने तंत्रज्ञान विस्तारत गेलं आणि हळूहळू दुसऱ्या क्षेत्रात कल वाढत गेला. लोकं शेती सोडून नोकरीच्या मागे लागली. आता पुन्हा शेतीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे आणि लोक पुन्हा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीत देखील मोठे बदल करत आहेत.

माणसाने कितीही प्रगती केली, कितीही पैसा कमवला तरी जेवताना हे अन्नच लागते. अगदी सोन्याच्या ताटात सुद्धा अन्न असेल तरच माणूस खाऊ शकतो. सध्याच्या रासायनिक शेतीपेक्षा जर ऑरगॅनिक म्हणजेच सेंद्रिय शेतीतील धान्य मिळत असेल तर आपसूक त्याच्याकडे लोक आकर्षित होतात.

हे सर्व लिहिण्याचे कारण एकच! Two Brothers India या कंपनी विषयी आणि या भावाबद्दल आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया आहेत तरी कोण हे two brothers!

काय आहे या दोन भावांची पार्श्वभूमी ? – Two Brothers India – What is the background of these two brothers?

सत्यजित आणि अजिंक्य हे दोघे पुण्यात राहणारे भाऊ आहेत. सत्यजित मोठा आणि अजिंक्य धाकटा अश्या या दोन्ही भावांची शिक्षणे पुण्यातच झाली. अजिंक्य यांनी कॉम्प्युटर सायेन्स मध्ये पदवी प्राप्त केली आहे त्याचबरोबर इंदिरा कॉलेजमधून एम.बी.ए. केले आहे. त्यांनी चार वर्षे HDFC, HSBC अश्या मोठ्या बँकेत काम केले आहेत.

अजिंक्य यांचे मोठे भाऊ सत्यजित यांनी अर्थशास्त्रात बी. ए. केले आहे आणि त्यांच्याकडेही एम.बी.ए. ची पदवी आहे. यांनीही कोटक लाईफ इन्शूरन्स, सिटीकार्प फायनन्स आणि डीबीएससारख्या मोठ्या बँकिंग क्षेत्रात सुमारे दहा वर्षे काम केले आहे.

का सोडली बँकेची नोकरी?

दोन्ही भावांच्या लहानपणापासून शिक्षण, नोकरी हेच करिअर आहे असे मनावर बिंबवले गेले होते पण त्यांच्या मनात कुठेतरी काहीतरी चुकतंय असे यायचे. शेती करणे हे त्यांचे पॅशन होते. त्यांची आवड म्हणून दोघांनी नोकरी सोडली आणि शेतीकडे वळले. दोन्ही भावांनी तेव्हा प्लॅन बी ठेवलाच नव्हता. आता जे काही करायचे ते शेतीतून असे ठरवले आणि सुरुवात झाली Two Brothers India ऑरगॅनिक शेतीची.

Two Brothers India – एक शेतीचा ब्रँड कसा तयार झाला?

तर या दोन्ही कष्टकरी भावांची सुरुवात ऑरगॅनिक पपई लागवडीपासून झाली. मातीत एकही रसायन न मिसळता नैसर्गिक पद्धतीने, सेंद्रिय पद्धतीने शेती केली की मातीचा पोत सुधारतो याच विश्वासावर पहिली पपई लागवड झाली. सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेली ही पपई दिसायला आकर्षक नव्हती मात्र त्याची चव गुळासारखी गोड होती. सगळ्यात आधी त्यांनी ही पपई पुण्याच्या मार्केट यार्ड मध्ये विकायला नेली. तिथे लिलावात त्या पपईसाठी फक्त चार रुपये मिळत होते. हे दोघांच्या मनाला कुठेतरी लागले. तिथल्या विक्रेत्यांनी सांगितले; “लोक चव बघून नाही तर बाहेरचे रूप पाहून ते विकत घेणार आहेत.” यामुळे आता आपण चुकीच्या ठिकाणी मार्केटिंग केली आहे हे लक्षात घेऊन दोघे मॉल्स मध्ये गेले. शहरी जीवन अनुभवल्यामुळे त्यांना माहीत होते मॉल्समध्ये ऑरगॅनिक वस्तूंना मागणी असतेच परंतु तिथेही अडचणी होत्या. मॉल्स मध्ये विक्री करण्यासाठी त्यांना बऱ्याच कागदपत्रांची आणि नोंदण्या करण्याची गरज होती आणि तेवढा वेळ त्यांच्या हातात नव्हता.

आता एक शेवटचा पर्याय म्हणून दोघांनी हात गाडीवर फळे विकतात त्यांना गाठले आणि त्यांच्या सोबत बसून ग्राहकांना दोन्ही पपई मधील फरक सांगितला. सेंद्रिय पपईची चव घेऊन दहा पैकी सहा ग्राहकांनी ती खरेदी केली. अश्या पद्धतीने दोघांनी मग हातगाडीवाल्या फळ विक्रेत्यांना ती पपई देणे सुरु केले.

आता प्रश्न असा होता जर ग्राहकाला ती पपई पुन्हा खायची असेल तर तो संपर्क कसा करणार? कारण ना त्या फळ विक्रेत्यांना यांच्या बद्दल माहित होते ना ग्राहकांना. याच विचाराने दोघांनी आपला एक ब्रँड असावा असा विचार करून Two Brothers India हा ब्रँड सुरू केला.

या प्रवासात त्यांच्या अडचणी काय होत्या?

पहिले चार वर्ष दोघांचा तोटा होत होता. सगळ्यात आधी जेव्हा त्यांनी डाळिंब लावले तेव्हा फक्त शेणखत, गोमूत्र अश्या गोष्टींचा वापर खत म्हणून केला होता. मात्र यात डाळिंबावर तेल्या म्हणून आजार चढला. यात डाळिंबाला तेलासारखे डाग पडून ते आपोआप फुटू लागले. अश्या चुका करत करत आणि अभ्यास करत करत दोघांनी यात सुधारणा केली. सुरुवातीला फक्त व्हॉट्सअँप वरून ऑर्डर्स घेण्याचे काम दोघे करत होते. शिकत शिकत आणि सोबत मार्केटिंग करत करत दोघे शेती बघत होते. सुरुवात या दोघांनी केली आणि आता त्यांचा स्टाफ वाढला आहे.

Two Brothers India कंपनी नक्की काय काम करते?

Two Brothers India ही कंपनी लहान लहान शेतकऱ्यांना शेतीची आधुनिक पद्धत सांगतात. मशिन्सचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने उत्पादन कसे घेता येऊ शकते हे ते सांगतात आणि शेतकऱ्यांना नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यासाठी प्रोत्साहन देतात. शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला माल ते ऑनलाईन पद्धतीने बाजारपेठेत विकतात. ही एक ऑनलाईन कंपनी आहे जिथे भुईमुगाच्या शेंगा, शेंगदाणा तेल, कणीक म्हणजेच गव्हाचे पीठ, तूप हे सर्व पारंपरिक पद्धतीने बनवून विकले जाते. त्यांच्या याच वेगळेपणामुळे ग्राहक त्यांच्याशी जोडले गेले आहेत.

आज बाजारात सगळीकडे भेसळ आणि रासायनिक पद्धतीने प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ पाहायला मिळतात अश्यातच या भावांनी लोकांना अगदी खात्रीशीर सेंद्रिय आणि पारंपरिक पद्धतीने बनलेले पदार्थ देण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याने त्यांच्याकडे मोठा ग्राहकवर्ग आहे.

Two Brothers India turnover किती आहे?

२०१४ मध्ये दोन्ही भावांनी पुण्याजवळ असणाऱ्या भोदानी गावात सेंद्रिय शेती सुरू करण्यास आरंभ केला. त्यांनी पूर्णवेळ शेतीत राहून काम करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांच्या कंपनीचा turnover चार मिलियन डॉलर्स आहे. यांची कंपनी वार्षिक बारा कोटीचा व्यवसाय करते.

सेंद्रिय शेती सुरू करण्यासाठी कशी सुरुवात केली?

दोघांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी; सेंद्रिय शेती क्लब सुरू करण्यासाठी पुण्यामधील शाळांमध्ये एक कार्यक्रम सुरू केला. त्यांच्या कार्यक्रमामुळे ९ हजार शेतकरी प्रेरित झाले. दोन्ही भाऊ मिळून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती विषयी माहिती आणि शेती कशी करायची हे शिकवू लागले.

आजच्या तरुणाईला त्यांनी काय संदेश दिला आहे?

सत्यजित यांचे म्हणणे असे आहे की, शेती आधुनिक पद्धतीने केली पाहिजे. तंत्रज्ञानाची कास धरून शेतीत प्रगती करता येऊ शकते. यातून खूप चांगले उत्पादन आणि पर्यायाने उत्पन्न काढता येऊ शकते. याचा विचार सुशिक्षित बेरोजगारांनी नक्कीच केला पाहिजे.

1 thought on “दोन भावांनी उभा केला करोडो रुपयाचा शेतकरी ब्रॅंड – two brothers india”

Leave a Reply