बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिकोडी जिल्हा स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर नाही, असे महसूलमंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी विधानसभेत सांगितले. बेळगाव जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव नाही, मात्र यासंबंधीची मागणी जुनीच आहे. योग्यवेळी चिकोडी जिल्ह्याचा विचार करू, असे ग्वाहीही त्यांनी दिली.
निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महसूलमंत्री पुढे म्हणाले, बेळगाव जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव सध्या सरकारसमोर नाही. मात्र, चिकोडी जिल्हा घोषित करण्यासंबंधी अनेक मागण्या सरकारकडे आल्या आहेत. या मागण्यांचा विचार करून सविस्तर प्रस्ताव देण्यासाठी 16 जुलै 2022 रोजी प्रादेशिक आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. नूतन जिल्ह्याची घोषणा करण्याचा विषय राज्य सरकारच्या सामान्य धोरणासंबंधीचा विषय आहे. जिल्ह्याची घोषणा करण्यासाठी भौगोलिक, प्रशासकीय गरजांबरोबरच आर्थिक परिस्थितीचाही विचार करावा लागतो. त्यामुळे सध्या राज्य सरकारने कोणत्याच नव्या जिल्ह्यांसंबंधी निर्णय घेतला नाही.
कोणत्याही नव्या जिल्ह्याची निर्मिती करताना भौगोलिक पार्श्वभूमी, लोकसंख्या, नव्या जिल्ह्यामुळे नागरिकांना होणारी अनुकूलता, जिल्हा केंद्रापासूनचे अंतर आदी गोष्टींचा विचार केला जातो, असेही कृष्ण भैरेगौडा यांनी सांगितले.
बेळगाव जिल्हा भौगोलिकरीत्या मोठा जिल्हा आहे. जिल्हा विभाजनाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्हावा लागतो. यासंबंधी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगतानाच जनगणती पूर्ण होईपर्यंत नवीन महसूल सीमा निर्माण करू नये, असे केंद्र सरकारने कळविले आहे. त्यामुळे सध्या जिल्हा विभाजनासंबंधी निर्णय घेता येणार नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्यवेळी यासंबंधी निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
#Belgaum #BelgaumDistrict #Chikodi #KarnatakaPolitics #RevenueMinister #GovernmentProposal #DistrictDivision #PoliticalUpdates #LocalGovernance #RegionalCommissioner #BelgaumNews #ChikodiDistrict #LegislativeAssembly #PublicDemand #AdministrativeChanges #KarnatakaGovernment #DistrictFormation #CommunityConcerns #PolicyDiscussion #StateAdministration
There is no proposal for division of Belgaum district