अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या अनावरण कार्यक्रमावेळी
बेळगाव—belgavkar—belgaum : अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या अनावरण कार्यक्रमावेळी जय महाराष्ट्राचा जयघोष झाल्यामुळे कन्नड संघटनांमध्ये पोटशूळ निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा दिल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच आमदार अभय पाटील यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी कन्नड संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे.
‘जय महाराष्ट्र’चा जयघोष केला
रविवारी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संभाजी महाराज स्मारकाचे अनावरण करण्यात आले होते. यावेळी मंत्री भोसले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ‘जय महाराष्ट्र’चा जयघोष केला होता. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यामुळे नेहमीच महाराष्ट्राबाबत आकस असलेल्या कन्नड संघटनांनी जाणीवपूर्वक स्मारक उद्घाटन कार्यक्रमानंतर शहराचे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
महाराष्ट्राबाबत असलेला आकस दाखवून दिला
मंगळवारी एका कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोषणाबाजी करून आपला कंठ शमवून घेतला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मंत्री भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. यातून पुन्हा एकदा कन्नड संघटनांनी महाराष्ट्राबाबत असलेला आकस दाखवून दिला असून, या संघटना सातत्याने शहर आणि परिसरातील मराठी भाषिकांना आणि समिती कार्यकर्त्यांना नाहक त्रास देत असतात.
गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात असलेले मराठी फलक हटवण्याची मागणी करण्यासह व्यापारी व इतर लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. त्यामुळे कन्नड संघटनांना प्रशासनाने आवर घालावा, अशी मागणी सातत्याने केली जाते आहे. मात्र, प्रशासन कन्नड संघटनांना पाठीशी घालत असल्याचे चित्र सातत्याने पहावयास मिळत असते. मंत्री भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करून पुन्हा एकदा कन्नड संघटनांनी वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रशासनाने त्यांना वेळीच समज द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
Shivendrasinhraje Bhosale with MLA Abhay Patil
Shivendrasinhraje Bhosale with MLA Abhay Patil