५ सप्टेंबर रोजी Teachers Day म्हणजेच टीचर्स डे साजरा केला जातो. आपल्या भारतीय संस्कृती नुसार आई नंतर गुरूला महत्त्व असते. आई जसे आपल्या मुलांवर संस्कार करते, मुलांना घडवते त्यात शिक्षकांचाही वाटा मोठा असतो. संपूर्ण आयुष्याच्या जडणघडणीत शिक्षक एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
आपल्या विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला योग्य ते मार्गदर्शन करण्याचे महत्त्वाचे काम शिक्षकाचे असते. असे कित्येक विद्यार्थी असतात ज्यांना केवळ एक शिक्षक सुधारून सरळ मार्गाला आणतो.
विद्यादानाचे एक महत्त्वाचे काम शिक्षकाच्या हातून होत असते. आपल्या शिष्यांनी खूप शिकून आयुष्यात स्थिरस्थावर व्हावे हेच प्रत्येक शिक्षकाला वाटते. आपल्या हातून घडलेले हे शिष्य जेव्हा मोठमोठ्या हुद्द्यावर कामाला लागतात किंवा काही असाधारण करतात तेव्हा मात्र त्याचा सगळ्यात जास्त अभिमान हा एका शिक्षकाला वाटतो.
आपल्यासाठी आपले शिक्षक जीवतोड मेहनत घेतात, प्रसंगी कान धरतात पण पुढील वाटेवर असलेले काटे आपल्या पायाला टोचू नये म्हणूनच त्यांची अशी कृती असते हे सर्व जाणून आणि शिक्षकांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन म्हणजेच टीचर्स डे साजरा केला जातो.
भारतात ५ सप्टेंबरलाच का होतो Teachers Day साजरा?
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर रोजी असतो. त्यांचा हा जन्मदिवस Teachers Day म्हणून साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान पाहून त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा भारतात आहे.
भारताच्या राजकीय इतिहासात डोकावले तर दिसते की, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारताच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशी दोन्ही पदे त्यांनी भूषवली. राजकारणात त्यांनी आपल्या या कामाचा ठसा उमटवला असला तरीही अगदी शेवटपर्यंत ते एक आदर्श शिक्षक होते.
त्यांच्या स्मरणार्थ हा ५ सप्टेंबर हा दिवस Teachers Day म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात १९६२ मध्ये पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा करण्यात आला होता.
शिक्षक दिनाचा इतिहास काय?
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक उत्कृष्ट शिक्षक होते. त्यांनी आपल्या आयुष्यातील जवळजवळ ४० वर्ष या क्षेत्रात घालवली. ते विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचाही विचार करायचे. एकदा त्यांच्या विद्यार्थी आणि मित्रांनी त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याबद्दल विचारणा केली तेव्हा ते म्हणाले; “माझा जन्मदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी शिक्षक दिन म्हणून साजरा झाला तर मला त्याचा अभिमान वाटेल.” आणि म्हणूनच १९६२ सालापासून हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला.
असे हे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व्यासंगी होते. त्यांना एक दोन नव्हे तर तब्बल २७ वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या देशात कधी कधी शिक्षक दिन साजरा केला जातो?
५ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय Teachers Day म्हणून युनोस्कोने जाहीर केला आहे. १९६५ ते १९९४ मध्ये रशियात ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या रविवारी शिक्षक दिन साजरा करण्याची पद्धत होती. युनोस्कोच्या निर्णयानंतर मात्र १९९४ पासून रशियाने ५ ऑक्टोबर ही तारीख शिक्षक दिन म्हणून स्वीकारली.
नोव्हेंबरमध्ये इंडोनेशिया, व्हिएतनाम या देशात शिक्षक दिन साजरा केला जातो. तसेच ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यांसारख्या देशात ऑक्टोबर मध्ये शिक्षक दिन साजरा करण्याची पद्धत आहे.
चीनमध्ये १९३१ पासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. नॅशनल सेन्ट्रल यूनिव्हर्सिटी मधून ही सुरुवात झाली. २७ ऑगस्ट कन्फ्यूशिअसचा जन्मदिवस म्हणून सन १९३९ मध्ये हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला. मात्र, १९८५ मध्ये १० सप्टेंबर या दिवसाला शिक्षक दिन म्हणून मान्यता मिळाली.
साधारण २० व्या शतकापासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात पसरली. जागतिक स्तरावर वेगवेगळ्या दिवशी का होईना पण Teachers Day साजरा केला जातो.
भारतात शिक्षक दिन कसा साजरा केला जातो?
एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर बाहेरच्या जगाशी ओळख करून देतो. बाहेरील जगात वावरताना काय काळजी घ्यायची, आपली प्रगती कायम योग्य दिशेने व्हावी यासाठी काय करायचे आणि असे अनेक प्रश्न शिक्षक सोडवतो ज्यामुळे विद्यार्थी उंच भरारी घेतात. यासाठीच शिक्षकांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या या अमूल्य ठेव्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा केला जातो.
या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. सादरीकरण, गायन, भाषणे अश्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विद्यार्थी स्वतःच्या हाताने शिक्षकांसाठी भेट कार्ड बनवतात. फुले, भेट कार्ड, पेन अश्या भेटी विद्यार्थी अगदी प्रेमाने शिक्षकांना देतात. मोठ्या वर्गातील विद्यार्थी शिक्षकांच्या भुमितेक शिरून तो एक दिवस संपूर्ण शाळेची जबाबदारी घेतात. आपण वर्गात करत असलेली दंगा, मस्ती सहन करून शिक्षक कसे आपल्याला शिकवतात याची जाणीव Teachers Day या दिवशी विद्यार्थांना झाल्यावाचून राहत नाही.
FAQ:-
शिक्षक दिन म्हणून कोणाचा वाढदिवस साजरा केला जातो?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
Teacher’s Day कार्यक्रम कसा सुरू करावा?
शिक्षकांना शुभेच्छा देऊन सर्वांचे स्वागत करून महत्त्वाच्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगून कार्यक्रमाची सुरुवात करावी.