Controversy over Sambhaji Maharajs statue unveiling program in Angol
बेळगाव—belgavkar—belgaum : गेल्या 2 वर्षांपासून लोकार्पणाच्या प्रतिक्षेत असलेल्या अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्ती लोकार्पण कार्यक्रमावरुन वाद निर्माण झाला आहे. गुरुवारी तेथे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर तेथील धर्मवीर संभाजी महाराज चौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मूर्ती लोकार्पण कार्यक्रम लांबणीवर टाकण्याची मागणी
गुरुवारी शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्याला काही ग्रामस्थांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे तेथील तणावात भर पडली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तेथील तणाव निवळला. कार्यक्रमाला आक्षेप घेणाऱ्या व मूर्ती लोकार्पण कार्यक्रम लांबणीवर टाकण्याची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांना यासंदर्भात महापालिकेला निवेदन देण्याची सूचना केली. त्यामुळे ग्रामस्थ महापालिकेकडे निघून गेले.
काम अद्याप पूर्ण न झाल्याने अनावरण कार्यक्रम लांबणीवर टाकण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन महापौर सविता कांबळे यांना दिले. महापौर कार्यालयात उपस्थित नसल्याने आवक-जावक विभागात निवेदन दिले.
दरम्यान, कार्यक्रम लांबणीवर टाकण्याची मागणी करुनही प्रतिष्ठा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांच्यारह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. 5 जानेवारी रोजी मूर्तीचे लोकार्पण केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील आमदार शिवेंद्रराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
5 जानेवारीच्या कार्यक्रमाबाबत काय? : आक्षेप असतानाही वास्तुशांती कार्यक्रम झाला. पण, आता मूर्ती लोकार्पण सोहळ्याचे काय? असा प्रश्न आहे. ग्रामस्थांच्या मागणीची दखल महापौर घेणार का…? 5 जानेवारी रोजीचा कार्यक्रम रद्द केला जाणार का? हे पाहावे लागणार आहे.
Sambhaji Maharajs statue unveiling program in Angol