Navratri Colours, Ghatasthapna Muhurta 2024:- नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्याचे दिवस. आता अश्विन महिन्यात येणाऱ्या या नवरात्री उत्सवाला शारदीय नवरात्रौत्सव म्हणतात. यंदा ३ ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. यावर्षीचे म्हणजेच 2024 चे नऊ रंग, घटस्थापना मुहूर्त आणि पूजेची माहिती जाणून घेऊया.
पितृपक्ष संपला की वेध लागतात ते Navratri चे. देवीच्या नऊ रूपांची पूजा, देवीचा जागर अगदी भक्तिमय वातावरणात साजरा होत असतो. भारतात सगळीकडे नवरात्रोत्सव अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून Navratri ला सुरुवात होते.
नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि प्रत्येक दिवशी एक रंग असतो. देवीची साडी, चुनरी या रंगानुसार रोज बदलतात आणि समस्त महिला वर्गही नवरात्रीच्या नऊ रंगात मिसळलेला दिसतो.
शारदीय नवरात्र म्हणजेच अश्विन नवरात्र तारीख आणि मुहूर्त २०२४ (2024 Navratri Date)
हिंदू पंचांगानुसार यावर्षी म्हणजेच २०२४ मध्ये अश्विन महिन्यातील नवरात्र तिथी २ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. शारदीय नवरात्रीची ही तिथी 2 ऑक्टोबरला दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी सुरू होईल आणि ४ ऑक्टोबरला पहाटे २ वाजून ५८ मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही ३ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होईल.
2024 घटस्थापना मुहूर्त
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. २०२४ मध्ये हा मुहूर्त ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे ६ वाजून १५ पासून ते ७ वाजून २२ मिनिटांपर्यंत असेल. तर घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ४६ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असेल.
शारदीय नवरात्र घटस्थापना पूजा विधी
- आपल्या शास्त्रानुसार कोणत्याही पुजेआधी घराची स्वच्छता करावी आणि पूजेच्या दिवशी लवकर उठून शुचिर्भूत होऊन पूजेसाठी तयार व्हावे.
- जिथे घटस्थापना करायची आहे ती जागा व्यवस्थित स्वच्छ करून गंगाजल शिंपडून ती जागा पवित्र करा.
- उत्तर किंवा ईशान्य दिशेला पाट किंवा चौरंगावर वस्त्र अंथरून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा.
- कलश स्थापनेसाठी एक मातीचे भांडे घेऊन त्यात धान्य घाला.
- यानंतर तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाका.
- कलशावर धागा बांधून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढा.
- कलशात अक्षदा, सुपारी आणि नाणे ठेऊन कलशाला चुनरी बांधा.
- तयार कलशावर श्रीफळ (नारळ) ठेवा.
- विधी नुसार देवीची पूजा करावी. देवीला विडा ठेवावा.
- नैवेद्य म्हणून फळे, मिठाई अर्पण करा.
- सर्व पूजा आणि पाठ वाचून झाल्यावर आरती करा.
- प्रसाद म्हणून देवीला अर्पण केलेली फळे आणि मिठाई वाटा.
शारदीय नवरात्री 2024 तिथी
- दिवस पहिला – ३ ऑक्टोबर, गुरुवार – घटस्थापना, शैलपुत्री पूजा
- दिवस दुसरा – ४ ऑक्टोबर, शुक्रवार – ब्रह्मचारिणी पूजा
- दिवस तिसरा – ५ ऑक्टोबर, शनिवार – चंद्रघंटा पूजा
- दिवस चौथा – ६ ऑक्टोबर, रविवार – विनायक चतुर्थी
- दिवस पाचवा – ७ ऑक्टोबर सोमवार – कुष्मांडा पूजा
- दिवस सहावा – ८ ऑक्टोबर मंगळवार- स्कंदमाता पूजा
- दिवस सातवा – ९ ऑक्टोबर बुधवार- कात्यायनी पूजा
- दिवस आठवा – १० ऑक्टोबर, गुरुवार – कालरात्री पूजा
- दिवस नववा – ११ ऑक्टोबर, शुक्रवार – दुर्गा अष्टमी, महागौरी पूजा शारदीय
- दिवस दहावा -१२ ऑक्टोबर, शनिवार – नवमी हवन, दुर्गा विसर्जन, विजयादशमी, दसरा, शस्त्रपूजा
नवरात्रीचे नऊ रंग 2024 (Navratri Colours 2024)
- गुरुवार, ३ ऑक्टोबर:- पिवळा (Yellow)
- शुक्रवार, ४ ऑक्टोबर:- हिरवा (Green)
- शनिवार, ५ ऑक्टोबर:- राखाडी (Gray)
- रविवार, ६ ऑक्टोबर:- नारंगी (Orange)
- सोमवार, ७ ऑक्टोबर:- पांढरा (White)
- मंगळवार, ८ ऑक्टोबर:- लाल (Red)
- बुधवार, ९ ऑक्टोबर:- निळा (Blue)
- गुरुवार, १० ऑक्टोबर:- गुलाबी (Pink)
- शुक्रवार, ११ ऑक्टोबर:- जांभळा (Purple)
नवरात्रीच्या रंगाचे महत्त्व 2024 (Importance of Navratri Colours)
- पिवळा रंग मन प्रसन्न आणि प्रफुल्लित करतो.
- हिरवा रंग आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी म्हणून ओळखला जातो.
- राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो
- नारंगी हा रंग शांतता, ज्ञानाचे प्रतीक आहे.
- पांढरा रंग निर्मळ, शांतता, पवित्रतेचे प्रतीक आहे.
- लाल रंग प्रेम, राग आणि संघर्ष याचे प्रतीक मानला जातो.
- निळा रंग हा उर्जेचे प्रतीक मानला जातो.
- गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो.
- जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असतो.
नवरात्रोत्सव नऊ दिवस साजरे करण्याचे कारण (Reason Behind Celebrating Navratri 2024)
Navratri उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो या संदर्भात एक कथा सांगितली जाते ती अशी;
धार्मिक ग्रंथानुसार प्राचीन काळी महिषासुर नावाच्या राक्षसाने थैमान घातले होते. त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून अनेक वरदाने प्राप्त करून घेतली होती आणि त्याच जोरावर त्याने सगळीकडे थैमान घातले होते. त्याने गर्वात देवराज इंद्रांना युद्धासाठी ललकारले आणि देवांचा पराभव करून स्वर्गाचा ताबा मिळवला.
यासर्वाला घाबरून देवांनी त्रिदेव अर्थात ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्याकडे धाव घेतली आणि या संकटावर काहीतरी उपाय सुचविण्यासाठी सांगितले. त्रिदेवांनी देवांना आदिशक्तीला आवाहन करण्यास सांगितले आणि देवांनी अगदी तसेच केले.
देवांच्या या मनापासून केलेल्या प्रार्थनेला आदिशक्ती प्रसन्न झाली आणि तिने महिषासुराचा नाश करण्यासाठी दुर्गा अवतार धारण केला. सर्व देवांनी तिच्या कृपावत्सल रूपाला आपापली शस्त्रे दिली आणि देवीने देखील प्रेमाने ती स्वीकारली आणि महिषासुर राक्षसाला आवाहन दिले.
देवी आणि महिषासुराचे अखंड नऊ दिवस युद्ध सुरू राहिले आणि दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला देवीने महिषासुराचा वध केला. सर्वांनी देवीचा जयजयकार केला आणि हे नऊ दिवस नवरात्रोत्सव म्हणून साजरे करण्यात येऊ लागले.