आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाला विशेष स्थान असते. श्रावण आला की सणांची रेलचेल सुरू होते. श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी (Nag Panchami ). चला तर मग नागपंचमीची पूजा योग्य पद्धतीने कशी करावी?, नागपंचमीचे महत्त्व काय? हे सर्व आपण या ब्लॉग मधून जाणून घेऊया.
हिंदू धर्मात नागपंचमीला Nag Panchami विशेष महत्त्व आहे. नागपंचमीची पूजा कशी करावी? हे आता पाहूया.
नागपंचमीची पूजा करण्यासाठी प्रथम पाटावर नागाची प्रतिमा काढावी किंवा मातीचे नाग आणून ते पूजनासाठी ठेवावे. नागाच्या प्रतिमेला किंवा मुर्त्यांना हळद, कुंकू, फुले वाहावित. दूध साखर आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण करावा आणि मनोभावे प्रार्थना करावी. पूजेवेळी ‘नमोsस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु!’ ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्य: सर्पेभ्यो नम:! हा मंत्रोच्चार करावा. नागपंचमीची कहाणी वाचावी.
नागपंचमीची पौराणिक कहाणी कोणती?
एकदा एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत असतो. त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात शिरल्याने बिळात असलेली नागाची पिल्ले मरतात. काही वेळाने नागीण तिथे येते आणि आपल्या पिल्लांना मृतावस्थेत पाहते. पिल्लांना असे पाहून ती खूप चिडते आणि रागात शोध घेऊ लागते तेव्हा तिच्या लक्षात येते की, शेतकऱ्याच्या नांगरामुळे आपली पिल्ले मृत झाली आहेत. ती मनोमन शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला संपण्याचा विचार करते आणि रागाच्याभरात शेतकरी आणि त्याच्या पत्नीला दंश करून मारते. त्याची एक मुलगी तिच्या सासरी असते ती तिला मारण्याच्या हेतूने तिथे जाते. त्याची मुलगी पाटावर नागांचे चित्र काढून त्यांची पूजा करण्यात दंग असते. नागीण ते सर्व पाहते. शेतकऱ्याची मुलगी अगदी मनोभावे सर्व करते आणि नागिणीचा राग शांत होतो. ती तिच्या पुजेमुळे प्रसन्न होते आणि तिच्या आई वडिलांना पुन्हा जिवंत करते.
नागपंचमीच्या दिवशी काय काळजी घ्यावी?
जुन्या परंपरेनुसार या दिवशी काही चिरू नये, जमीन नांगरू नये, भाजू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये असे सांगितले गेले आहे.
काय असेल यामागचे शास्त्रीय कारण?
श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाच्या काळात शेत जमिनीत सापांचे, नागांचे बीळ असते. त्यांना शेत नांगरल्यावर काही इजा होऊ नये म्हणूनच ही प्रथा सुरू झाली असावी. त्याचप्रमाणे पूर्वी स्त्रिया फक्त आणि फक्त घरात राहून रांधा, वाढा उष्टी काढा हेच करत असायच्या. कुटुंबे देखील मोठी असायची त्यांना विश्रांती अशी मिळायचीच नाही. घरातील स्त्रियांना थोडा तरी आराम मिळावा या हेतूने काही चिरु – कापू नये, भाजू नये, तळू नये अशी प्रथा रूढ झाली असावी.
यादिवशी नैवेद्याला काय असते?
नागपंचमी Nag Panchami दिवशी पुरणाची दिंडी किंवा काही भागात ज्याला पातोळ्या म्हणून ओळखले जाते ते केले जाते. सोबत वरण भात असतोच.
कसा साजरा केला जातो नागपंचमी सण?
घरोघरी नागाची मनोभावे पूजा केली जाते. पूर्वीच्या काळच्या स्त्रिया आणि मुली या दिवशी झोपाळा खेळायला बाहेर पडायच्या. हातावर मेहंदी काढली जायची आणि अगदी आनंदात हा सण साजरा केला जायचा. या दिवशी शेतीच्या कामांना सुट्टी दिली जाते. नागांच्या किंवा सापाच्या बिळांना आणि त्यांच्या पिल्लांना काही इजा होऊ नये हा त्यामागचा हेतू.
नागपंचमी (Nag Panchami) हा सण कोणकोणत्या राज्यात साजरा केला जातो?
नागपंचमी Nag Panchami हा संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा सण आहे. गुजराथ, राजस्थान, केरळ आणि महाराष्ट्रात तर अगदी उत्साहात हा सण साजरा केला जातो.
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे सगळ्यात मोठा उत्सव साजरा केला जात असे. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हा एकमेव प्रदेश निसर्ग समृध्द आहे. याच्या जवळच चांदोली अभयारण्य आणि चांदोली धरण आहे.
पूर्वी जेव्हा येथे नागपंचमीचा (Nag Panchami) उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत होता तेव्हा नागपंचमीच्या साधारण महिनाभर आधीपासूनच येथील मंडळे नाग पकडण्याच्या मोहिमेवर जायची. तरुण मंडळी हातात लांब काठी आणि नाग ठेवण्यासाठी मडके घेऊन या भागात फिरून नाग पकडत असत. पाच – सहा जणांचा एक ग्रुप अश्या पद्धतीने नाग पकडण्यासाठी ही तरुण मंडळी फिरत असत. पकडलेल्या नागांची नागपंचमी (Nag Panchami ) संपेपर्यंत अगदी व्यवस्थित काळजी घेतली जायची.
नागपंचमीच्या दिवशी शिराळा गावात ग्रामदेवतेच्या पूजेनंतर एकाचवेळी १०० ते १२० नागांची एकाचवेळी मिरवणूक काढली जायची. यात विविध स्पर्धा असायच्या. कोणता नाग सर्वात लांब, कोणाचा फणा सर्वात मोठा अश्या स्पर्धा व्हायच्या आणि नागांचे खेळ खेळले जायचे. लोक हजारोंच्या संख्येने येथे हे खेळ पाहण्यासाठी येत. याचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे अगदी दोन वर्षाच्या बालकापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत नाग गळ्यात घालून फोटो काढले जायचे.
कालांतराने नागांचे होणारे हाल पाहून निसर्ग आणि वन्य जीव प्रेमींनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. मुंबई हायकोर्टाने देखील वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार २००२ मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचे खेळ किंवा प्रदर्शन भरवणे, स्पर्धा करणे यावर बंदी आणली आणि या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशनासाकडे सोपवली गेली. त्यामुळे काही वर्षांपासून बत्तीस शिराळा येथे नागांची फक्त प्रतीकात्मक मिरवणूक काढली जाते.
नागपंचमी (Nag Panchami) या सणाचे महत्त्व काय?
आपल्या भारतात सर्व सण हे काही ना काही चांगल्या हेतूनेच साजरे करण्याची प्रथा पडली आहे. त्या सणाच्या निमित्ताने काहीतरी चांगले घडावे, निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी अशी परंपरा प्रत्येक सणामागे असते.
श्रावण महिना हा शिवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो आणि शिवाचे प्रतीक नाग म्हणूनच या सणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याच बरोबर सरपटणाऱ्या प्राण्यांपासून आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे म्हणून ही पूजा केली जाते.
वैज्ञानिक दृष्टीने नागांचे रक्षण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.