उसाच्या शिवारात बिबट्या मृतावस्थेत
बेळगाव—belgavkar—belgaum : हिरेअंगरोळीजवळील (ता. खानापूर) उसाच्या शिवारात एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या रविवारी मृतावस्थेत आढळून आल्याने वन खात्याची झोप उडाली आहे. प्रथमदर्शनी आजार अथवा वार्धक्यामुळे बिबट्याचा जीव गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण उत्तरीय तपासणीनंतरच समजणार आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, रविवारी सकाळी परिसरातील शेतकऱ्यांना उसाच्या शिवारात बिबट्याचे कलेवर दिसून आले. याबाबत त्यांनी तातडीने गोलिहळ्ळी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती दिली.
बिबट्याची नखे, दात, त्वचा हे सर्व अवयव तसेच असल्याने
वनक्षेत्रपाल संतोष सुंबळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरगाळी उपविभागाचे साहाय्यक वनसंरक्षक शिवानंद मगदूमही घटनास्थळी दाखल झाले. पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. बिबट्याची नखे, दात, त्वचा हे सर्व अवयव तसेच असल्याने हा शिकारीचा प्रकार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तरीही वन खात्याने प्रकरणाची नोंद करुन मृत्यूचा तपास सुरु केला आहे.
बिबट्याच्या शरीराचा मागचा भाग कुजण्याच्या मार्गावर असल्याने 20 ते 25 दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सोमवारी सकाळी जिल्हा वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या शरीराचे अवयव तपासणीसाठी वन्यजीव वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
Leopard found dead in Belgaums Khanapur