फ्लाईट IC 814 हायजॅक हे भारतात केलेले सर्वात काळे दहशतवादी कृत्य मानले जाते. 24 डिसेंबर 1999 मध्ये पाच दहशतवाद्यांनी भारताचे विमान हायजॅक केलेल्या सत्य घटनेवर आधारित ही वेबसिरीज आहे. त्या घटनेवर Netflix वर फ्लाईट IC-814 या नावाने वेबसिरीज नुकतीच प्रकाशित झाली आहे.ही वेबसिरीज प्रकाशित झाली आणि प्रकाशित होताच ती वादाचा भोवऱ्यात झापडली आहे.
काय आहे वादाचा मुद्दा ?
Netflix वर 29 ऑगस्ट रोजी ‛IC 814: द कंदाहार हायजॅक’ ही वेबसिरीज रिलीज झाली आहे. पण ही वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे कारण या वेबसिरीजमध्ये दहशतवाद्यांना जाणीवपूर्वक गैर-मुस्लिम नावे दिली गेल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वेबसिरीज बायकॉट करण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण देखील दिले जात आहे.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार IC 814 या वेबसिरीजवरून Netflix कंटेंट हेडना माहिती प्रसारण मंत्रालयाने समन्स बजावला आहे. IC 814 कंदाहार विमान हायजॅक प्रकरणी तयार करण्यात आलेल्या वेब सिरीजमधून नेटफ्लेक्सने दहशतवाद्यांची मुस्लिम नावे जाणीवपूर्वक लपवल्याचा आरोप करण्यात येतोय. याच सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपण कंदाहार प्रकरण नेमके काय आहे ते पाहू.
दहशतवाद्यांनी केले होते भारतीय विमान हायजॅक
24 डिसेंबर 1999 मध्ये पाच दहशतवाद्यांनी भारताचे विमान IC 814 हायजॅक केले होते. या विमानात 179 प्रवाशी प्रवास करत होते.जवळपास एक आठवडा विमान अपहरणकर्त्यांच्या ताब्यात होते. अपहरण केलेल्या प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात भारतातील तुरुंगात असलेल्या तीन दहशतवाद्यांची सुटका करण्याची मागणी त्यांनी केली होती आणि ती मागणी पूर्ण करून भारतीय तुरुंगात असलेल्या तीन दहशतवाद्यांना सोडण्यात आले.या अपहरणात एका प्रवाशाचा मृत्यू देखील झाला होता.कंदाहार हायजॅक प्रकरणामुळे तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारवर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती.
IC 814 या फ्लाईटचा प्रवास कुठून कुठे होणार होता?
24 डिसेंबर 1999 रोजी नेपाळच्या काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावरून संध्याकाळी 4 वाजून 25 मिनिटांनी इंडियन एअरलाईन्सच्या ‛IC 814’ या विमानाने उड्डाण केले. दीड तासात आपण दिल्लीत पोहोचू अशा मानसिक तयारीत असलेल्या प्रवाशांना मात्र सात दिवसांचा थरार अनुभवावा लागला. netflix ने याच घटनेवर आधारित वेब सिरीज रिलीज केली आहे.
कसे आणि कधी झाले विमानाचे अपहरण
या विमानात एकूण 179 लोक होते त्यात अकरा कर्मचारी होते. प्रवाशामध्ये पुरुष 106, 57 महिला, 19 मुले आणि चार लहान बाळांचा समावेश होता. दुपारी 4 वाजून 53 मिनिटांनी विमानाचे हायजॅक झाले होते. एअर ट्राफिक कंट्रोलला( ATC) यासंदर्भातील माहिती 4 वाजून 56 मिनिटांनी कळवली होती. अपहरणकर्त्यांना विमान पाकिस्तातील लाहोरमध्ये उतरवायचे होते पण ATC ने परवानगी नाकारली म्हणून मग त्यांनी विमान पंजाबमधील अमृतसरमध्ये उतरवले. विमानातील इंधन संपले होते म्हणून मग त्यांनी अमृतसरमध्ये विमानात इंधन भरण्याची मागणी केली.त्यांची मागणी फेटाळून लावण्यात आली.पंजाब सरकारकडून तिथेच विमान थांबवून ठेवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. गृहमंत्री, एनएसएकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे अपहरणकर्त्यांनी मोर्चा लाहोरकडे वळवला.
लाहोर विमानतळावर विमान उतरवण्याची परवानगी मागण्यात आली पण ती लाहोर विमानतळ प्रशासनाने नाकारली पण इंधन संपल्याने विमानाचा अपघात होऊ शकतो ही सबब पुढे करून पुन्हा परवानगी देण्यात आली.त्याठिकाणी इंधन भरण्यात आले आणि 32 मिनिटात विमान अफगाणिस्तानच्या काबुलकडे निघाले.कबूल प्रशासनाने आमच्याकडे पुरेशा सुविधा नाहीत हे कारण पुढे करून विमान दुबईला घेऊन जायला सांगितले.नंतर विमान 1वाजून 32 मिनिटांनी दुबई विमानतळावर उतरवण्यात आले.यूएई सरकार आणि अपहरणकर्त्यांमध्ये वाटाघाटी होऊन विमानातील 27 प्रवाशांची सुटका करण्यात आली आणि रुपीन काट्याल या प्रवाशाला एका दहशतवाद्याने चाकू मारून मारले होते त्याचा मृतदेह तिथेच देण्यात आला.
त्यानंतर अफगाणिस्तानातील कंदाहार या ठिकाणी विमान सकाळी 8 वाजून 33 मिनिटांनी उतरवण्यात आले.त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत हायजॅक थरार नाट्य संपेपर्यंत हे विमान तिथेच होते.त्या दरम्यान आतंकवादी आणि भारत सरकार यांच्यात वाटाघाटी सुरूच होत्या
काय होत्या आतंकवाद्यांच्या मागण्या ?
सुरवातीला अपहरणकर्त्यांनी भारतातील तुरुंगात असलेल्या 36 दहशतवाद्यांना सोडावे आणि यात कुरकर्मा महसुद अजरहर ज्याने जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली त्याचा समावेश होता.यानेच पुलवामा अपघात घडवून आणला होता. तसेच दहशतवाद्यांनी साजिद अफगाणी याचे पार्थिव आणि 200 मिलियन डॉलर्सची मागणी केली होती. अफगाण सरकार देखील दहशतवाद्यांशी वाटाघाटी करत होते. त्यांनी पैसा आणि पार्थिवाची मागणी गैरइस्लामिक आहे असं म्हणून त्या मागण्यांचा विरोध केला.त्यामुळे दहशतवाद्यांनी या मागण्या मागे घेतल्या.अखेर भारत सरकारने मसुद अजहर, मुश्ताक झरगार आणि ओमर शेख यांना मुक्त केले त्यानंतर दहशतवाद्यांनी सर्व प्रवाशी आणि क्रू मेंबर्सची सुटका केली 1 जानेवारी 2000मध्ये सर्व प्रवासी स्पेशल विमानाने भारतात परत आले.मुक्त केलेल्या तीन दहशतवाद्यांनी पुढे अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले. पाजपेय सरकारवर दहशतवाद्यांपुढे झुकले म्हणून भारतातून खूप टीकेची झोड उठली होती.
या सगळ्या मागे कोणाचा होता हात?
अर्थात याचे उत्तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि ते उत्तर म्हणजे पाकिस्तान! पाच ही दहशतवादी पाकिस्तानी होते आणि आज ते पाकिस्तानात मुक्तपणे फिरत आहेत.