लाल परीचा संप मिटला – ST Bus strike – मोठी सुट्टी + गणपती म्हणजेच हा सुवर्ण योग कोण सोडेल? आणि गावाला जायचे म्हणजे डोळ्या समोर येते आपली लाल परी! लाल परीचा म्हणजेच एसटीचा प्रवास आरामदायी आणि खिशाला परवडणारा असतो. अमृत ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात दिली जाणारी १०० टक्के सूट, महिला आणि जेष्ठ नागरिकांना दिली जाणारी ५० टक्के सूट यामुळे सामन्यातील सामान्य माणूसही एसटीने प्रवास करतो. बरेचजण लाल परीने प्रवास करून आपल्या गावाला जातात पण अश्यातच ST Bus strike झाला आणि सगळ्याच प्रवाशांचा खोळंबा झाला. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या शहरात काय परिस्थिती होती आणि हा संप मिटला का ते.
सध्या सणासुदीचे दिवस सुरू झालेत. अगदी परवावर आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे आणि त्यासाठी चाकरमानी यासाठी आपल्या गावाला जाण्यासाठी निघत आहेत.
ST Bus strike – कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती आहे?
- नाशिक:- नाशिकच्या रस्तावर एकही एसटी बस धावताना दिसली नाही. आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले असून नाशकात एकही बस रस्त्यावर धावली नाही.
- लातूर:- लातूर मध्ये पाच बस डेपो कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने जवळ जवळ एका दिवसाचे ५० लाखांचे नुकसान एसटी महामंडळाला झाले आहे.
- अमरावती:- अमरावती जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती असल्याने तेथे प्रवाशांची गर्दी वाढली आहे.
- त्याच प्रमाणे वाशिम, अकोला, धाराशिव, नंदुरबार याही ठिकाणी हा संप केला गेला.
ST Bus strike – कारण काय?
लाल परी ही सगळ्या वाहतूक व्यवस्थेचा जीव आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि गावाला जाणाऱ्या प्रवाशांना बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संपाचे एकच प्रमुख कारण सांगण्यात येत आहे. राज्य सरकार प्रमाणे आम्हालाही सवलती द्या ही एकच मागणी या कर्मचाऱ्यांची आहे.
मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून हे आंदोलन सुरू आहे. इतर शासकीय कर्मचाऱ्यांसारखे वेतन, महागाई भत्ता, वार्षिक वेतन वाढ अश्या या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.
याच बरोबर ज्या एसटी खराब झालेल्या आहेत; ज्या आता चालण्याच्या स्थितीत नाहीत त्या बंद करण्यात याव्यात, एसटी कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी एक सुसज्ज खोली मिळावी, जुलै २०१८ ते २०२४ पर्यंत जो काही महागाई भत्ता आहे तो मिळावा अश्या काही मुख्य मागण्या त्यांच्या होत्या.
ST Bus strike –मिटला का?
एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. या बैठकीत मंत्री तसेच एसटी समितीचे कर्मचारी देखील सामील होते. यात काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत आणि हा ST Bus strike मिटला आहे.
ST Bus strike – बैठकीत काय निर्णय झाले?
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ६५००/- रू. वाढ करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यातील ही एक महत्त्वाची मागणी पूर्ण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
ST Bus strike – परिणाम काय झाला?
सध्या सणासुदीचे; गणपतीचे दिवस असल्याने शेकडो चाकरमानी लोकं आपल्या गावाला जाण्यासाठी निघाली आहेत त्यामुळे एसटी स्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. प्रवशांची अचानक तारांबळ उडत होती. काही प्रवाशी नाईलाजाने खाजगी वाहनाने पुढील प्रवास करण्याचा निर्णय घेताना दिसत होते.
एसटी हे सर्वसामान्य माणसांचे अगदी हक्काचे आणि खात्रीशीर वाहतुकीचे साधन पण हीच लाल परी जेव्हा संप पुकरते तेव्हा सर्वसामान्य जनतेचे होणारे हाल आणि या गोष्टीचा गैरफायदा घेणारे संधीसाधू असे समीकरण हे ठरलेलेच असते.
ST Bus strike मुळे २५१ आगरांपैकी बरेच आगार पूर्णतः बंद झाले होते. ११ कामगार समितीच्या या संपामुळे गणपतीच्या ज्यादा एसटी वाहतुकीला फटका बसू नये साठी एसटी महामंडळाने कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला.
ST Bus strike चा सगळ्यात मोठा फटका मराठवाडा आणि खानदेश या भागांना बसला कारण मराठवाड्यातील २६ आगार पूर्णतः तर खानदेशातील ३२ आगार पूर्णतः बंद होते.
आता मात्र हा ST Bus strike मिटलेला असून एसटी कर्मचारी पुन्हा सेवा देण्यासाठी सुसज्ज होऊन आलेले आहेत. मात्र अजूनही प्रश्न तसाच आहे; किती दिवस या लाल परीला गृहीत धरले जाणार आहे?