गणपती बाप्पा आले की पाठोपाठ वेध लागतात गौरींच्या आगमनाचे. सोनपावलांनी गौरी (Gauri) घरात पदार्पण करतात. समस्त महिला वर्ग गणपतीच्या तयारीला ज्या उत्साहात कामाला लागलेला असतो त्याच उत्साहात गौरींच्या आगमनासाठी तयारी करत असतो.
अगदी सजावटी पासून ते फराळ करण्यापर्यंत सगळेच गुंतलेले असतात. गौरींना सजविण्यासाठी असलेले दागिने, साड्या तर कित्येक दिवस आधीपासून घरात आलेले असतात. गजरे, हार आणि निरनिराळ्या डिझाइनच्या गेजवस्त्र माळा गौराईचे सौंदर्य अजूनच खुलवतात.
महाराष्ट्रात गणपती सोबत गौरींचे देखील आगमन होते. शक्यतो जेष्ठा आणि कनिष्ठा अश्या दोन गौरींचे आगमन होते. यंदा म्हणजेच २०२४ मध्ये १० तारखेला जेष्ठा गौरी (Gauri) आवाहन म्हणजेच गौरींचे आगमन होणार आहे. ११ सप्टेंबरला गौरी पूजन आणि १२ सप्टेंबरला विसर्जन.
आपापल्या परंपरेनुसार खड्याच्या, मुखवटे, तांब्यावरच्या किंवा चित्राचे पूजन केले जाते. घरात सुख, समृध्दी नांदावी म्हणून गौरींचे पूजन केले जाते.
कधी आहे शुभ मुहूर्त?
१० सप्टेंबर रोजी गौरी (Gauri) आवाहन होणार आहे. यादिवशी रात्री ८ वाजून ४ मिनिटापर्यंत दिवसभरात कधीही गौरी आवाहन करता येणार आहे. ११ तारखेला पूजन आहे आणि १२ तारखेला रात्री ९ वाजून ५१ मिनिटापर्यंत कधीही विसर्जन करता येणार आहे.
गौरी (Gauri) पूजनात काय काय केले जाते?
आपापल्या परंपरेनुसार गौरी (Gauri) पूजनाच्या दिवशी विविध पदार्थांचा नैवेद्य गौरीला अर्पण केला जातो. यात पुरण पोळी, कटाची आमटी, भाज्या, कोशिंबीर, चटणी, भात, पापड, कुरडया, भजी, अळू वडी, कढी अश्या अनेक पदार्थांचा आपापल्या परंपरेनुसार समावेश असतो.
ज्या दिवशी गौरींचे आगमन होते त्या दिवशी फराळ, साखर खोबरे, काकडीचे काप असे पदार्थ प्रसाद म्हणून वाटले जातात. फराळही नैवेद्यात ठेवला जातो.
गौरी (Gauri) पूजन झाले की संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ केला जातो. जागरण केले जाते. यात महिला झिम्मा, फुगड्या असे खेळ खेळतात.
विसर्जनाच्या दिवशी दही भाताची पुरचुंडी दिली जाते. आपल्या घरावर अशीच कृपा दृष्टी राहूदे, घर धन धान्याने भरलेले राहूदे अशी प्रार्थना केली जाते. मुखवटे हलवून विसर्जन करतात.
गौरींसाठी काय काय तयारी करावी?
ही तयारी ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार असते. काही जणांकडे खडे आणून म्हणजेच नदी काठचे पाच लहान लहान खडे आणून त्यांची गौरी म्हणून पूजा केली जाते. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवला जातो, काही ठिकाणी तांब्यावर मुखवटे बसवले जातात तर काही ठिकाणी तेरड्या पासून गौरी बनवल्या जातात.
गौरीला नवीन साडी नेसवली जाते. संपूर्ण अलंकारांनी गौरीला सजवले जाते. शुभ मुहूर्तावर गौरी (Gauri) बसवल्या जातात. घरात आणताना सुंदर रांगोळी काढलेली असते. पावले काढली जातात.
गौरी घरात येत असताना “गौर आली गौर आली कशाचा पायी? सोन्या रूपाच्या पायी” असे म्हणत गौरीला मापटे ओलांडून आत घेतले जाते. गौरी (Gauri) विराजमान झाल्यावर ओटी भरली जाते आणि नित्य आरत्या घेतल्या जातात. गौरी पूजनाच्या दिवशी दुपारीच पुरणाची महाआरती केली जाते.
माहेरी आलेली माहेरवाशीण म्हणून गौरीचे कोडकौतुक करतात. आजूबाजूच्या बायका जमून हळदी कुंकू, खेळ, भजने असे कार्यक्रम करतात. गौरी पूजनाच्या दिवशी सवाष्ण जेऊ घालतात.
कोकणात गौरीच्या ववस्याची प्रथा आहे. तेथील परंपरेनुसार बायका एका सुपात पूजेचे साहित्य घेऊन गौरीची पूजा करायला जातात. फळांचे आणि भाज्यांचे काप, हळदी कुंकू, अक्षदा, साखर किंवा मिठाई, ओटीचे साहित्य असे सर्व सुपात घेऊन पूजा केली जाते. यातील एक वाण गणपतीला ठेवले जाते. गौरींची ओटी भरून त्यातही हे वाण ठेवले जाते. एकत्र जमलेल्या इतर बायकांनाही हे वाण देण्याची प्रथा आहे. नवीन लग्न झालेल्या महिला सात सुपे घेऊन येतात. सातही सुपात असेच सर्व तयार केलेले असते.

दोन गौरी कोण असतात?
दोन गौरी म्हणजेच जेष्ठा आणि कनिष्ठा. या दोन गौरी गणपतीच्या बहिणी असल्याचे मानले जाते. या माहेरपणासाठी, आपल्या लाडक्या भावाला भेटण्यासाठी येतात.
काय आहे पारंपरिक कहाणी?
एक गरीब ब्राम्हण होता. भाद्रपद महिन्यात सगळ्यांकडे गौरी आणल्या गेल्या. त्याच्या मुलांनी हे पाहिले आणि आईकडे जाऊन हट्ट केला तूही गौरी आण. घरी पूजेसाठी, नैवेद्यासाठी काही सामान नाही म्हणून तिने त्यांना आपल्या वडिलांना आधी सामान आणून द्या म्हणून सांगा असे सांगून मुलांना पाठवले. मुलांची तळमळ पाहून ब्राह्मणाला कसेतरी झाले. गुणी मुले पण गरिबी पुढे काय करणार? म्हणून जीवन संपवण्याच्या उद्देशाने तो तळ्याकाठी गेला. तिथे एका म्हातारीने त्याला पाहिले आणि चार गोष्टी शिकवल्या. तीही त्या रात्री त्यांच्या घरी आली. ब्राह्मणाने आपल्या बायकोला काहीतरी खायला करायला सांगितले. तिने आंबील करण्यासाठी मडके पाहिले तर कण्यांनी ते काठोकाठ भरले होते. त्या रात्री सगळे पोटभर खाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी म्हातारीने आपल्याला न्हाऊ घालून गोडाचा स्वयंपाक करायला सांग असे सांगितले.
ब्राम्हणाच्या बायकोने तिला न्हाऊ घातले. त्यादिवशी त्याला चांगली भिक्षा मिळाली. गूळ देखील भरपूर मिळाला. गोडाचा स्वयंपाक झाला. उद्या आपल्याला खीर हवी असे म्हातारी म्हणाली. यावर आपल्याकडे दूध नसल्याचे ब्राम्हणाने सांगितले. म्हारतीने त्याला अंगणात जितक्या गायी – म्हशी हव्या तेवढे खुंटे बांधायला सांगितले. गोरज मुहूर्तावर गायी – म्हशी येतील तू त्यांच्या नावाने त्यांना हाका मार असेही सांगितले. खरेच गोरज मुहूर्तावर आपापल्या वासरांसोबत गायी – म्हशी आल्या. भरपूर दूध मिळाले आणि खीर झाली.
आता म्हातारीने मला परत नेऊन सोड असे सांगितले. यावर ब्राह्माण तुम्ही आल्यामुळे सुख समृध्दी नांदत आह तर तुम्हाला कसे सोडू असे म्हणाला. यावर म्हातारीने त्याला सांगितले; जेष्ठा गौरी म्हणतात ती मीच. मला परत नेऊन सोड. येताना नदी काठची माती घेऊन येऊन घरभर पसरव कधीही काहीही कमी पडणार नाही.