किल्ला तलावासाठी ₹ 9.20 कोटी मंजूर
बेळगाव—belgavkar—belgaum : किल्ला तलावाचा लवकरच कायापालट होणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत तलावाच्या विकासासाठी ₹ 9.20 कोटी मंजूर रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी 8 कोटी रुपये विकास प्रकल्पांसाठी खर्च केले जाणार असून उर्वरित 1.20 कोटी रुपये देखभाल व दुरुस्तीसाठी वापरले जाणार आहेत.
डॉ. रजनीश यांचे बेळगावशी जुने नाते
कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. बेळगाव महापालिकेने तलावाच्या विकासाचा आराखडा आधीच तयार केला आहे. निधी प्राप्त होताच प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाणार आहे. पूर्वी लघु पाटबंधारे खात्याच्या अखत्यारित असलेला किल्ला तलाव २०२० मध्ये महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला. तेव्हापासून सर्वसमावेशक नागरी विकास प्रकल्प राबविण्यास सुरवात झाली.
राज्याच्या मुख्य सचिव डॉ. रजनीश यांचे बेळगावशी जुने नाते आहे. बेळगावच्या जिल्हाधिकारी असताना महापालिकेच्या प्रशासक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता. या कार्यकाळात त्यांनी किल्ला तलावाच्या विकासाला चालना दिली होती. सध्या त्या हिवाळी अधिवेशनासाठी बेळगावात आल्या असून किल्ला तलावाला भेट देऊन विकासकामे राबविण्याबाबत चाचपणी केली.
तलाव परिसरात अर्बन फॉरेस्ट संकल्पना
तलाव परिसरात नागरी जंगल (अर्बन फॉरेस्ट) संकल्पना राबवून खुला रंगमंच विकसित करावा अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तलाव मनोरंजन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्यासह हायमास्ट उभारणे व अन्य आवश्यक सुविधा स्थापित केल्या जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तलाव परिसरात अनेक विकासकामे FortLakeBD
गेल्या काही वर्षांत किल्ला तलाव परिसरात अनेक विकासकामे झाली आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत वॉकिंगट्रॅक, बोटिंग सुविधा आणि लेझर टेक पार्कची सोय करण्यात आली आहे. मात्र, या सुविधांचा लाभ लोकांना नियमितपणे घेता आलेला नाही. आता मंजूर झालेल्या ९.२० कोटी रुपये निधीतून तलाव परिसराचे पुनरुज्जीवन करुन आणखी चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देणे व त्या लोकांपर्यंत पोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Belgaum: Rs 9 crore for the development of Killa Lake
FortLakeBD