Chetan Singh Rathore is new IGP Northern Range
Inspector-General of Police (IGP) Northern Range
बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) विकास कुमार यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी नूतन आयजीपी म्हणून डॉ. चेतनसिंह राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री गृहखात्याने हा आदेश बजावला. त्यानुसार डॉ. राठोड यांनी बुधवारीआपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांची बढतीवर बदली करण्यात आली आहे. आयजीपी विकास यांनाही बढती मिळाली असून आता ते आता पश्चिम बंगळूरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून काम पाहतील. त्यांच्या जागी आलेले डॉ. राठोड २००७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. डॉ. राठोड मूळचे मध्य प्रदेशचे असून फलोत्पादन विज्ञानात त्यांनी डॉक्टरेट मिळविली आहे. यापूर्वी त्यांनी न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचे संचालक व बंगळूरचे पोलिस उपायुक्त म्हणून सेवा बजावली आहे. एक कर्तव्यदक्ष व धडाडीचे अधिकारी म्हणून ते प्रसिध्द आहेत.
सध्या म्हैसूरमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस आयुक्त सीमा लाटकर यांनाही बढती मिळाली असून त्या त्याच जागेवर कायम राहणार आहेत.
बेळगावचे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनाही बढती मिळाली असून ते देखील बेळगावातच कायम राहतील.
जिल्हा लोकायुक्त विभागाचे पोलिसप्रमुख हनुमंतराय, याआधी बेळगावात काम केलेले डॉ. संजीव पाटील, बागलकोटचे विद्यमान जिल्हा पोलिसप्रमुख अमरनाथ रेड्डी, यशोदा वंटगोडी व अन्य आयपीएस अधिकाऱ्यांनाही बढती मिळाली आहे.
Chetan Singh Rathore is new IGP Northern Range