4 प्रशिक्षित हत्ती आणि अनुभवी माहुतांच्या मदतीने मोहीम
बेळगाव : खानापूर : गेल्या नऊ महिन्यांपासून खानापूर तालुक्यातील शेतकर्यांची डोकेदुखी ठरलेल्या सुळेधारी हत्तीला (टस्कर) पकडून त्याचे तालुक्याबाहेर स्थलांतर करण्यात वन खात्याला गुरुवारी यश आले. शिमोगा व नागरहोळे अभयारण्यातील वन्यजीव तज्ज्ञ, 4 प्रशिक्षित हत्ती आणि अनुभवी माहुतांच्या मदतीने राबविलेली ही मोहीम सहा तास चालली.
ड्रोन कॅमेर्याची मदत
त्यामुळे, शेतकर्यांच्या नाराजीचा सामना करणार्या वन खात्याच्या अधिकार्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. आठ दिवसांपूर्वी वन्यजीव विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी खानापुरातील उपद्रवी हत्तीला पकडण्याचे आदेश दिले होते. त्यासाठीची आवश्यक तयारी स्थानिक अधिकार्यांनी आठ दिवसांपासून चालविली होती. बुधवारी सकरबैलमधून (जि. शिमोगा) 4 प्रशिक्षित हत्ती आणि माहूत खानापुरात दाखल झाले.
डार्ट गनच्या साहाय्याने टस्कराला बेशुद्धीचे इंजेक्शन
गुरुवारी सकाळी सातपासून टस्कराचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. त्यासाठी ड्रोन कॅमेर्याची मदत घेण्यात आली. शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या जळगे गावाजवळील जंगलात तो दिसून आला. यावेळी वन्यजीव तज्ज्ञ डॉ. सुरेश यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने त्याला बेशुद्ध करण्याची कामगिरी बजावली. डार्ट गनच्या साहाय्याने टस्कराला बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात आले. त्याच्या समोरील व मागील पायाला दोरखंड बांधून ते प्रशिक्षित हत्तींच्या पायांना बांधण्यात आले. प्रशिक्षित हत्तींच्या मदतीने टस्कराला मोकळ्या जागेत आणण्यात आले.
चार प्रशिक्षित हत्तींचे टस्कराभोवती कडे तयार करून क्रेनच्या पट्ट्यांनी त्याला बांधण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने टस्कराला ट्रकमध्ये उचलून ठेवण्यात आले. मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण, जिल्हा वनाधिकारी मारिया ख्रिस्तू राजा डी., एसीएफ सुनीता निंबरगी, आरएफओ श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी व बघ्यांनी एकच गर्दी केली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. टस्कराला सकरेबैल हत्ती अभयारण्यात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कळपापासून फारकत टस्कराबरोबरच नऊ हत्तींचा स्वतंत्र कळप तालुक्यात दाखल झाला होता. सध्या हा कळप दांडेली अभयारण्याच्या परतीच्या मार्गावर आहे. तथापि हा टस्कर त्या कळपातून बाहेर पडून खानापूर तालुक्यातच स्थिरावला होता. नऊ महिन्यांच्या काळात त्याने तालुक्यातील ऊस व भात पिकाचे नुकसान चालविले होते. त्यामुळे, शेतकर्यांना लाखोंचा फटका बसला होता. हत्तीची मजल लोकवस्तीपर्यंत पोचली होती. त्यामुळे, सहजीवन स्वीकारलेल्या या टस्कराला पकडण्यात वन खात्याला फारसे प्रयास पडले नाहीत.
Catching an elephant Khanapur Belgaum
Catching an elephant Khanapur Belgaum
Catching an elephant Khanapur Belgaum