Beed जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच आणखी एक गंभीर घटना घडली आहे. आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात गुरुवारी रात्री दोन सख्या भावांची जमावाने हत्या केली. या घटनेने जिल्हा हादरला आहे. मृतांची नावे अजय भोसले आणि भरत भोसले अशी आहेत.
हत्या कशी घडली?
अजय, भरत आणि त्यांचा भाऊ कृष्णा भोसले हे तिघे भाऊ हातोळण येथून वाहिरा गावात आले होते. तेथे गावातील काही लोक तसेच बाहेरचे काही लोक एकत्र जमले होते. रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या सुमारास या लोकांपैकी काहींनी लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या भयानक हल्ल्यात अजय आणि भरत यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा भाऊ कृष्णा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
also read – भाविकांचा भीषण accident, चार ठार, 11 जखमी
हत्या का झाली?
भोसले बंधूंचा त्यांच्या नातेवाईकांसोबत काही जुना वाद असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेच्या संदर्भात पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.
संशयित आरोपी ताब्यात (Beed News )
अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आठ जणांपैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मोठ्या दक्षतेने ही कारवाई केली. घटनेच्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, बाबासाहेब गर्जे, मनोजकुमार खंडागळे, भरत माने, दत्तात्रय टकले यांच्यासह पोलीस पथक उपस्थित होते.
पारधी समाजातील मृत भोसले बंधू
मृत अजय आणि भरत हे पारधी समाजातील होते. त्यांच्या कुटुंबावर अचानक आलेल्या या संकटामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही भावांचे मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे
कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न
मागील काही दिवसांपासून beed जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर लगेचच घडलेली ही घटना पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
या घटनेमुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. संबंधित घटनेबाबत सखोल तपास केला जात असून हत्येचे खरे कारण लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा आहे.