बेळगाव : कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याने वाद @गांधीनगर

Belgaum Belgavkar
3 Min Read

बेळगाव—belgavkar—belgaum : कचऱ्याचे वर्गीकरण करुन देण्यास सांगितल्याने मनपाच्या सफाई कर्मचाऱ्याला अपशब्द वापरण्यासह जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी रविवारी एकाच्या विरोधात माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बादल डावाळे (वय 35, रा. ज्योतीनगर गणेशपूर) याने दिलेल्या फिर्यादीवरून वाजीद अब्दुलमलिक शेख (रा. गुल्जार गल्ली, न्यू गांधीनगर) याच्याविरोधात पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून घेतला आहे.

 

 

 

- Advertisement -

महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांनी शहर आणि उपनगरातील कचऱ्याची उचल करताना ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात यावे, अशी सूचना केली आहे. त्यामुळे मनपाच्या सफाई ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना याची अंमलबजावणी करण्यास सांगितल्याने सफाई कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन कचरा उचल करताना वर्गीकरण केले जात आहे. फिर्यादी बादल हे महानगरपालिकेचे सफाई ठेकेदार एन. डी. पाटील यांच्याकडे कंत्राटी पद्धतीवर कामाला आहेत. ते रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे 9 च्या दरम्यान गुल्जार गल्ली येथे घरोघरी कचरा उचल करण्यासाठी गेले होते.

 

संशयित वाजीद यांच्या घरासमोर कचरा गाडी आली असता ते घरातून कचरा घेऊन बाहेर आले. त्यावेळी बादलने त्यांना ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून द्या, अशी मागणी केली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. वाजीद यांनी त्याला अपशब्द उच्चारण्यासह जातीवाचक शिवीगाळ केल्याने वाद विकोपास गेला. त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

ही माहिती शहर आणि उपनगरात कचरा गोळा करणाऱ्या अन्य सफाई कर्मचाऱ्यांना समजताच या घटनेचा निषेध करत त्यांनी कचरा उचल करण्याचे काम सोडून देऊन वाहनांसह माळमारुती पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीवकुमार नांद्रे देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले. मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र आल्याने पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी तातडीने ही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली.

सुरुवातीला कचरा उचल करण्यावरून सफाई कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची चर्चा होती. मात्र पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यात केवळ अपशब्द वापरण्यासह जातीवाचक शिवीगाळ केल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

गेल्या काही वर्षांपासून सफाई कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यासह मारहाण करण्याच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा शहरातील कचरा उचल केला जाणार नाही, अशी भूमिका सफाई कर्मचाऱ्यांनी घेतली. पण यावर ठाम निर्णय घेण्यात आलेला नाही. घडलेल्या घटनेनंतर शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी कचरा तसाच पडून होता. कचरावाहू वाहनांसह कर्मचारी पोलीस ठाण्याकडे गेल्याने पोलीस ठाण्याबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेवटी या प्रकरणी सफाई कर्मचारी बादल यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी जावेद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून घेतल्याने सफाई कर्मचारी शांत झाले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची पुढील तपास करीत आहेत.

belgaum garbage collection issue fir gandhinagar
belgaum garbage collection issue fir gandhinagar

belgaum garbage collection issue fir gandhinagar

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *