Bastar journalist found dead in septic tank, murder suspected
Journalist in Bijapur murdered, body found in septic tank
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात एका पत्रकाराची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तो तीन दिवसांपासून बेपत्ता होता. एका कंत्राटदाराच्या आवारातील सेप्टिक टँकमधून पोलिसांनी पत्रकाराचा मृतदेह बाहेर काढला.
धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या पत्रकाराने बस्तरमधील 120 कोटी रुपयांच्या रस्ते बांधकाम प्रकल्पातील कथित घोटाळा समोर आणला होता. हा घोटाळा समोर आल्यानतंर सरकारने कंत्राटदाराच्या कारभाराची चौकशी सुरू केली होती. त्यानंतर बेपत्ता झालेल्या पत्रकाराचा मृतदेह सापडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारीच्या रात्रीपासून बेपत्ता असलेले 33 वर्षीय पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी बिजापूर शहरातील चट्टणपारा भागातील एका कंत्राटदाराच्या आवारातील सेप्टिक टँकमधून सापडला. मुकेश चंद्राकर ‘बस्तर जंक्शन’ नावाने यूट्यूब चॅनल चालवत होते. याप्रकरणाची छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव यांनी गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह ज्या जागेतून सापडला तो परिसर कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन कोर्ट आणि नोकरांची घरे आहेत. बिजापूरचे रहिवासी पत्रकार मुकेश चंद्राकर हे 1 जानेवारीच्या रात्रीपासून घरातून बेपत्ता होते. यानंतर त्याचा मोठा भाऊ युकेश चंद्राकर याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुकेश चंद्राकर बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. सुरेश यांच्या मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनच्या आधारे मुकेश चंद्राकर हा कंत्राटराच्या आवारात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सेप्टिक टँकमधून मुकेश यांचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहावर 8-10 ठिकाणी जखमा आढळल्या. यावरुन मृतदेह पाहून पत्रकाराची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. डोक्याच्या मागच्या बाजूलाही जखमेच्या खुणा आढळल्या. हत्येनंतर मृतदेह सेप्टिक टँकमध्ये फेकून दिला होता. यानंतर कोणाला त्याचा सुगावा लागू नये म्हणून त्यावर प्लास्टरिंग करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पोलिसांनी सेप्टिक टँकचे फ्लोअरिंग तोडले तेव्हा आतमध्ये मृतदेह सापडला.
पीडित व्यक्तीच्या भावाने आम्हाला कळवले की मुकेश 1 जानेवारीपासून बेपत्ता आहे. आम्ही कारवाई सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्याचे शेवटचे लोकेशन देखील सापडले. आम्हाला संध्याकाळी एका टाकीमध्ये मुकेशचा मृतदेह सापडला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
Bastar journalist found dead in septic tank
Bastar journalist found dead in septic tank