बेळगाव—belgavkar—belgaum : अनगोळमध्ये महापालिकेने उभारलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे रविवारी अनधिकृतपणे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात कोणताही शिष्टाचार पाळण्यात आला नाही. त्यामुळे, सरकारच्या आदेशानुसार अनगोळच्या जनतेला सामावून घेऊन संभाजी महाराज मूर्तीचे अधिकृत अनावरण केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते संभाजी महाराज मूर्ती अनावरण
महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते रविवारी संभाजी महाराज मूर्ती अनावरण झाल्यानंतर अनगोळमधील रहिवाशांनी सोमवारी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी परवानगी नसताना धर्मवीर संभाजी चौकात उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी कोणत्याही प्रकारचा शिष्टाचार पाळला गेला नाही. त्यामुळे, अनगोळमधील 40 गल्ल्यांतील रहिवाशांची बैठक घेऊन नव्याने संभाजी महाराज मूर्तीचे अनावरण केले जाईल, असे रोशन यांनी स्पष्ट केले.
संभाजी महाराज मूर्तीचे अनावरण करण्यात येईल
अनगोळच्या जनतेने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकार्यांनी सर्वांचे आभार मानले. संभाजी महाराज मूर्ती परिसराचे काम अजून बाकी आहे. ते काम लवकरच पूर्ण केले जाईल. त्यानंतर महापालिकेकडून परवानगी दिली जाईल व संभाजी महाराज मूर्तीचे अनावरण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रोशन यांनी स्पष्ट केले. यावेळी जोतिबा लाटुकर, रामचंद्र शिंदोळकर, सुनील कंग्राळकर, दादा यळ्ळूरकर, रवी यळ्ळूरकर, मनोहर बुद्रूक, केदारी जाधव, अनिकेत भोसले, सुमित मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
संभाजी महाराज मूर्ती अनावरण करताना प्रशासन किंवा पोलिस खात्याची रितसर परवानगी घेण्यात आली नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत पोलिस आयुक्तांशी चर्चा करुन संबधितांवर कारवाई केली जाईल. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचा अवमान होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिले.
Sambhaji Maharaj statue Belgaum District Collector
Sambhaji Maharaj statue Belgaum District Collector