Vidhan Sabha Elections Code Of Conduct:- महाराष्ट्रात विधान सभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी राज्यात निवडणूक प्रक्रिया होणार असून २३ तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. १५ ऑक्टोबर रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता राज्यात आचार संहिता लागू करण्यात आली आहे पण आचार संहिता म्हणजे नेमके काय हे आपण या लेखात पाहणार आहोत.
आचार संहिता म्हणजेच (Vidhan Sabha Election)
भारतात केंद्रीय आयोगाकडून निवडणुका घेतल्या जातात. निवडणुका (Vidhan Sabha Election) होत असताना त्या कोणत्याही पक्षपाताशिवाय पार पडाव्यात ही जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. राजकीय पक्ष, निवडणुकीत सहभागी असलेले उमेदवार यांना निःपक्षपाती निवडणूक होण्यासाठी काही नियम पाळावे लागतात. हे जे नियम आखून दिलेले असतात त्यांनाच आचार संहिता असे म्हणतात.
आचार संहितेत असतो या गोष्टींचा समावेश
आचार संहिता लागू झाल्यावर निवडणूक आयोगाला विशेष अधिकार मिळतात. या काळात निवडणूक आयोग राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडे बारीक लक्ष ठेवून असते. जर निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांच्या चौकटी बाहेर कोणता पक्ष किंवा उमेदवार गेला म्हणजे नियमांचे उल्लंघन केले तर त्यावर कडक कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे असतो. आचार संहितेत निवडणूक रॅली, निवडणूक मिरवणुका, निवडणूक सभा, रोड शो, राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे वर्तन, मतदान केंद्राची शिस्त, निवडणुकीच्या दिवशी पक्ष आणि उमेदवारांचे आचरण, निरीक्षक आणि सत्ताधारी पक्षांची भूमिका याबद्दल उल्लेख आहे.
आचार संहिता लागू झाल्यावर असते या गोष्टींवर बंदी
- एकदा आचार संहिता लागू झाली की जाती – धर्माच्या नावावर मते मागता येत नाहीत.
- तसेच आचार संहिता लागू झाल्यावर कोणत्याही सरकारी योजनांच्या घोषणा, इतर कोणत्याही घोषणा, वास्तूंचे भूमिपूजन, पायाभरणी, योजनांचे लोकार्पण असे कोणतेही काम करता येत नाही.
- सरकारी गाडी, सरकारी बंगले आणि सरकारी विमान यापैकी कशाचाही वापर निवडणूक प्रचारासाठी करता येत नाही.
- कोणाच्याही जमिनीवर, घरावर, परिसरात किंवा भीतींवर पक्षांचे झेंडे, बॅनर परवानगीशिवाय लावता येत नाहीत.
- कोणताही पक्ष जाती धर्माच्या नावाखाली मते मागू शकत नाही आणि जाती धर्माच्या आधारे तणाव निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू शकत नाही.
- कोणत्याही राजकीय पक्षाची गर्दी कोणत्याही मतदान केंद्रावर होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते.
- मतदान बुथवर देखील कोणत्याही पक्षाचे प्रचाराचे साहित्य किंवा खाण्या पिण्याच्या गोष्टी असू नयेत.
- मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या २४ तास आधी दारूची दुकाने बंद असतात.
- मतदानाच्या वेळी मतदारांना पैसे किंवा मद्य वाटण्यावर बंदी असते.
- कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची बदली आचार संहिता लागू झाल्यावर निवडणूक आयोगाच्या परवानगी शिवाय करता येत नाही.
सभा आणि रॅली साठी असणारे नियम
- पोलिसांना सर्व रॅली ठिकाणाची माहिती आधीच द्यावी.
- ज्या ठिकाणी राजकीय पक्षांना किंवा नेत्यांना सभा घ्यायची असेल त्या ठिकाणी आधीपासूनच काही निर्बंध नाहीत ना हे पडताळून घेणे आवश्यक आहे.
- सभा घेताना जर लाऊड स्पीकर वापरायचे असतील तर आगाऊ परवानगी घ्यावी लागते.
- सभेत कोणत्याही प्रकारची अनपेक्षित घटना घडू नये म्हणून सभा आयोजकांनी पोलिसांची मदत घ्यावी.
मिरवणुकीसाठी असलेले नियम
- पोलिसांना मिरवणूक सुरू होण्याआधी मिरवणूक सुरू होण्याची वेळ, मिरवणुकीचा मार्ग, मिरवणूक संपण्याची वेळ आणि ठिकाण या सगळ्याची आगाऊ माहिती द्यावी.
- जसे सभेसाठी संबंधित भागात आधीच काही निर्बंध आहेत का हे पाहिले जाते तसेच मिरवणुकीसाठी देखील पहावे.
- मिरवणुकीचे व्यवस्थापन करताना वाहतुकीवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी.
- जर एकाच दिवशी आणि एकाच मार्गावरून एकापेक्षा अधिक राजकीय पक्षांनी मिरवणूक काढण्याचा प्रस्ताव मांडल्यास आधीच मिरवणुकीच्या वेळे बाबत चर्चा करावी.
- मिरवणूक रस्त्याच्या उजव्या बाजूने काढावी.
- मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे शस्त्र किंवा इतर हानिकारक साहित्य बाळगू नये.
- ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या सूचना व सल्ल्यांचे काटेकोरपणे पालन केले जावे.
Vidhan Sabha Election दिवशी लागू असलेले नियम
- अधिकृत कार्यकर्त्यांना राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी बॅच किंवा ओळखपत्रे द्यावीत.
- मतदारांना दिली गेलेली स्लीप साध्या कागदावर असावी म्हणजेच त्यावर कोणत्याही पक्षाचे चिन्ह किंवा नाव नसावे.
- निवडणुकीच्या ठिकाणी नेमलेल्या / तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.
- मतदान केंद्राजवळ उभारलेल्या छावण्यांमध्ये अनावश्यक गर्दी टाळावी.
सत्ताधारी पक्षाचे नियम
- पक्षाच्या हितासाठी सरकारी वाहने, विमाने वापरू नयेत.
- मंत्र्यांनी अधिकृत दौऱ्यात प्रचार करू नये.
- पक्षाच्या हितासाठी सरकारी यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांचा वापर करू नये.
- सरकारी निधीतून पक्षाचा प्रचार करू नये.
- केंद्र किंवा राज्य सरकारचे मंत्री, उमेदवार, मतदार किंवा एजंट वगळता इतर लोकांनी मतदान केंद्रात प्रवेश करू नये.