Atul Parchure Death:- मराठी तसेच हिंदी शोमध्ये काम केलेल्या अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी सोमवारी म्हणजेच १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये काम करणाऱ्या अतुल परचुरे (Atul Parchure) यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
गेल्या काही काळात त्यांना कॅन्सरशी झुंज द्यावी लागली होती. ते या जीवघेण्या आजारातून गेल्याच वर्षी बरे देखील झाले होते आणि त्यांनी पुन्हा शूटिंगला सुरुवात केली होती आणि आता अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने संपूर्ण मराठी सिने सृष्टीत शोककळा पसरली आहे. यामुळे मराठी चित्रसृष्टीची मोठी हानी झाली आहे.
Atul Parchure यांनी त्यांच्या आजारावर मात करत शूटिंगला सुरुवात केल्यावर ते अनेक कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या समोर आले होते. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी कार्यक्रमात भूमिका साकारल्या आहेत आणि त्या लोकप्रिय देखील ठरल्या आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अळीमिळी गुपचिळी’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकांमध्ये अतुल परचुरे (Atul Parchure) यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तसेच त्यांनी बऱ्याच नाटकांमध्ये देखील काम केले होते.
कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर अश्या काही प्रसिद्ध नाटकांमध्ये अतुल परचुरे (Atul Parchure) यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या भूमिकांमुळे आणि कामामुळे प्रचंड प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग त्यांना लाभला. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यावर सर्वांनाच दुःख झाले आहे.
Atul Parchure Death Reason
अतुल परचुरे हे गेल्या काही काळात कॅन्सरशी झुंज देत होते. गेल्या वर्षी त्यांचा कॅन्सर बराही झाला पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्येत पुन्हा बिघडली आणि काही complications निर्माण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकाची घोषणाही त्यांनी केली होती आणि यासाठी ते जोमाने तयारी देखील करत होते पण शेवटी त्यांच्या तब्येतीने साथ दिली नाही आणि शेवटी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना लिव्हर कॅन्सर झालेला होता आणि शेवटी हा कॅन्सर रूपी राक्षस जिंकला आणि अतुल परचुरे यांचे निधन झाले.
Atul Parchure यांनी त्यांच्या या आजारावर बोलताना सांगितले होते, “चुकीच्या उपचारांमुळे सुरुवातीला तब्येत बिघडत गेली. मी रुग्णालयात दाखल झालो आणि पहिली प्रोसिजर झाली. मला काय झालं ते सांगता येत नाही पण ती प्रोसिजर चुकली. त्याचे मेडिकल प्रुफ माझ्याकडे नाहीत. त्यातून मला पॅनिक्रिटायटिस झाला. मला चालता येत नव्हतं, बोलत असताना स्तब्ध व्हायचो. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी मला दीड महिना वाट पाहायला सांगितली. त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं, लिव्हरमध्ये पाणी होईल, कावीळ होईल किंवा जीवंतही राहणार नाही. शेवटी मी डॉक्टर बदलले. या सगळ्या प्रवासात संजय नार्वेकर आणि विनय येडेकर हे मित्र सावलीसारखे माझ्याबरोबर होते.”
राजकीय नेत्यांकडून अतुल परचुरे यांना श्रद्धांजली
हास्यसम्राट Atul Parchure यांनी मराठी बरोबरच हिंदी चित्रपट प्रेमींच्या मनात घर केले. मराठी बरोबरच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आणि प्रेक्षकांना हसवले. त्यांच्या या अचानक जाण्याने अनेक चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील लोकांनी श्रद्धांजली वाहून या दुखात सामील झाले.
चंद्रशेखर बावनकुळे; भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांचे ट्विट
अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी समोर येताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत अतुल परचुरे यांना भावनिक शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणतात; “प्रिय अतुल खरं खरं सांग आयुष्याच्या रंगमंचावरून अशी धक्कादायक एक्झिट घेताना तुझ्यावर, तुझ्या नाटकांवर अलोट प्रेम करणाऱ्या, अनेकानेक भूमिकांचा आनंद घेणाऱ्या रसिकांची तू काहीच पर्वा केली नाहीस. चटका लावून निघून गेलास. तुझ्या गालावरची गोड खळी आणि प्रसन्न हास्याने मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा अतुल परचुरे नावाचा अभिनेता आमच्यात नाही, हे वास्तव स्वीकारणे जड आहे. वेदना देणारे आहे. तुझ्या मराठी मालिका, नाटके आणि चित्रपट, इतकंच नव्हे तर हिंदी मालिका आणि चित्रपटातूनही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या भरोशावर तू जीवघेण्या आजारावर मात केलीस आणि ‘खरं खरं सांग..’ या नाटकातून तू पुन्हा रंगमंचावर दमदार एंट्री केली. तुझ्यातला अभिनेता सगळ्यांनी अनुभविला आणि सायंकाळी ही बातमी खूप धक्का देवून गेली. माझी विनम्र श्रद्धांजली..!!”
राजन विचारे यांच्याकडून अतुल परचुरे यांना श्रद्धांजली अर्पण
“ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झाल्याचे वृत्त कळले. अतुल परचुरे यांनी नुकतीच कॅन्सर सारख्या मोठ्या आजारावर मात करून नव्या जोमाने प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सुरुवात केली होती पण आज त्यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनमुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली असून परमेश्वर या दु:खातून सावरण्याचे बळ परचुरे कुटुंबियांना देवो व त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना” असे फेसबुक वर पोस्ट करत ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी अतुल परचुरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण
“मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने आपली छाप उमटविणारे अभिनेते अतुलजी परचुरे यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. स्व. अतुलजी परचुरे यांना विनम्र श्रद्धांजली. त्यांनी सहजसुंदर अभिनयातून साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांच्या पत्नी सोनियाजी यांच्यासह सर्व कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो” अशी पोस्ट करत निरंजन डावखरे यांनी अतुल परचुरे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.