विजयादशमी 2024 (Dussehra 2024) :- दसरा अर्थातच विजयादशमी! नवरात्री नंतर विजयादशमी साजरी केली जाते. यंदा म्हणजेच 2024 मध्ये 12 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. नवरात्रीची सांगता ही दसऱ्याने होते. या दिवशी रावणाचा पुतळा दहन करून वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचे स्मरण केले जाते. चला तर मग जाणून घेऊया शस्त्र पूजनाचा मुहूर्त आणि दसऱ्याची माहिती.
Dussehra Information (दसऱ्याची माहिती)
आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष दशमीला दसरा साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा दसरा (Dussehra) हिंदू धर्मात एक महत्त्वाचा सण म्हणून जल्लोषात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसर याच दिवशी महिषासुरमर्दिनी रुपात देवीने महिषासुराचा वध केला होता.
असत्यावर सत्याचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दसरा हा सण (Dussehra) साजरा केला जातो. या दिवशी सरस्वती आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते. भारतात आणि नेपाळ मध्ये नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी दसरा साजरा केला जातो. दसरा, दशहरा, दशैन किंवा विजयादशमी म्हणून हा सण ओळखला जातो.
प्रत्येक प्रांतानुसार, त्या त्या भागानुसार दसरा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. दक्षिण भारतात दसऱ्याने (Dussehra) दुर्गा पूजेची समाप्ती होते तर उत्तर भारतात रामलीलेची समाप्ती होते. दसऱ्याच्या दिवशीच मशिषासूर्मर्दिनीने महिषासुराचा वध केला होता तर प्रभू श्री रामांनी देखील दसऱ्याच्या दिवशीच रावणाचा वध केला होता.
Dussehra 2024 Shastra Pujan Muhurta
हिंदू पंचांगानुसार अश्विन शुक्ल दशमी तिथी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांपासून सुरु होईल आणि १३ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजून ८ मिनिटांपर्यंत असेल. दसरा हा सण (Dussehra) वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक मानला जातो.
यंदा म्हणजेच २०२४ मध्ये दसऱ्याचा शुभ मुहूर्त १२ ऑक्टोबर रोजी आहे. याच दिवशी रवी योगासह सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. या योगात कोणतेही काम केल्यास ते यशस्वी होतील. दसऱ्याला रवि योग दिवसभर असल्यामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होतील. तसेच सकाळी ६ वाजून २० मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ८ मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल. दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी २ वाजून ३ मिनिटांपासून ते २ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असेल.
दसऱ्याला केल्या जाणाऱ्या शस्त्रपूजनाचे महत्त्व
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त आहे आणि या दिवशी शुभ कार्य सुरू केल्याने विजय नक्कीच प्राप्त होतो. याच दिवशी देवीने महिषासुराचा वध केल्याने आणि प्रभू श्री रामांनी रावणाचा वध केल्याने क्षत्रीय लोक युद्धासाठी या दिवसाची वाट पाहायचे. या दिवशी शस्त्रांची पूजा करून युद्धास गेल्यावर विजय नक्कीच असतो असे मानले जाते म्हणूनच दसऱ्याला शस्त्रपूजा केली जाते.
दसरा (Dussehra) पूजेचा विधी
एका चौरंगावर किंवा पाटावर लाल वस्त्र अंथरावे. पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती रांगोळी काढावी. पाटीवर किंवा वहीवर सरस्वती काढावी. पूजेत वह्या, पुस्तके, पेन आणि घरात असलेली शस्त्रे पूजेत ठेवावीत. सर्व शस्त्र आणि सरस्वती यंत्राला हळद कुंकू वाहून सोने म्हणजेच आपट्याचे पान, फुले वाहावी. त्याचप्रमाणे घरातील टीव्ही, लॅपटॉप/ कॉम्प्युटर, वॉशिंग मशीन, फ्रिज, कूलर, गाडी इत्यादी गोष्टींची देखील पूजा करावी.
दसऱ्याला आपट्याची पाने वाटली जाण्यामागची कथा
पैठण शहरातल्या देवदत्त नावाच्या एका माणसाचा कौत्स हा मुलगा होता तो वेदतंतू नावाच्या ऋषिंकडे वेदाभ्यास करत होता. सर्व अभ्यास झाल्यावर त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी द्यायचे होते. वेदतंतू ऋषींनी ज्ञान वाटायचेच असते त्यामुळे मला काही नको सांगितले तरीही त्याने काहीतरी गुरुदक्षिणा म्हणून मागा असा त्यांच्या मागे तगादा लावला आणि वैतागून ऋषींनी कौत्साला सांगितलं तू १४ विद्या शिकलास ना, मग मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून दे. कौत्साला हे जमणार नाही आणि तो आपला हट्ट सोडून देईल असं वरतंतुंना वाटलं होतं पण कौत्स तसा हुशार.
तो दानशूर रघुराजाकडे गेला. रघुराजानं त्याचं स्वागत आणि विचारपूस केली आणि तुम्हाला काय हवं म्हणून विचारणा केली. कौत्सानं काहीसा संकोच करत आपली कहाणी सांगितली आणि राजा पेचात पडला.
रघुराजानं नुकतंच सगळी पृथ्वी जिंकल्यावर विश्वजीत यज्ञ केला होता आणि आपली सगळी संपत्ती आधीच गरिबांत वाटून टाकली होती. तो स्वतः एका झोपडीत राहू लागला, मातीची भांडी वापरू लागला.
त्यानं कौत्साची मागणी पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली आणि कुबेराकडे कूच करण्याचं ठरवलं. पण त्याची कुणकुण लागताच कुबेरानं युद्ध टाळण्यासाठी सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला.
रघुराजाचा खजिना पुन्हा सोन्यानं भरून गेला. त्यानं सगळं काही कौत्साला दान केलं पण कौत्सानं केवळ चौदा कोटी सुवर्णमुद्राच घेतल्या आणि वरतंतुंना दिल्या.
कुबेरानेही एकदा दिलेल्या मुद्रा पुन्हा घेण्यास नकार दिला. त्यामुळे राहिलेलं सगळं सोनं गावाबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आलं आणि कौत्सानं ते लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं हा दसऱ्याचा दिवस होता. या कहाणीमधूनच सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची प्रथा सुरू झाली.
आपट्याच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व
आपल्या सणांमध्ये काही ना काही शास्त्रीय कारण हे दडलेले असतेच. तसेच दसऱ्याला आपट्याचे पान सोने म्हणून वाटले जाते कारण त्याचा उपयोग बऱ्याच आजारांवर केला जातो. पूर्वी आपट्याच्या सालीचा रस पचनसंस्थेच्या रोगांवर वापरला जात असे. तसेच मुतखडा विकाराच्या औषधामध्ये आपट्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा तसेच याची पानं कफ आणि पित्त दोषांवर गुणकारी असल्याचं आयुर्वेदात सांगितलं जातं.