भारतातील बारा ज्योतिर्लिंग ची माहिती वाचा सविस्तर मराठीमध्ये -12 jyotirlinga Marathi

By Pratiksha Majgaonkar

Updated on:

12 jyotirlinga Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

12 jyotirlinga Marathi – सगळ्यात भोळा सांभ असणारा देव म्हणजे महादेव! श्री शिव शंकर! हा असा देव आहे जो भक्तांच्या हाकेला लगेच धावून येतो आणि भरभरून आपल्या भक्तांना देत राहतो. श्रावण हा शिव शंकराची पूजा आणि त्यांच्या भक्तीसाठी खास मानला जातो म्हणूनच आपण आज याच शिव शंकरांच्या ज्योतिर्लिंगांविषयी माहिती घेणार आहोत.

ज्योतिर्लिंग कसे निर्माण झाले?- 12 jyotirlinga Marathi

हिंदू धर्मातील पुराणात सांगितल्यानुसार शिव शंकर ज्या ज्या स्थानावर स्वतः प्रकट झाले होते त्या त्या स्थानावर ज्योतिर्लिंग स्थापण्यात आली आहेत.

कोण कोणती आहेत ज्योतिर्लिंग? – 12 jyotirlinga Marathi

ज्योतिर्लिंग बारा (12 jyotirlinga Marathi) आहेत आणि ती खालील प्रमाणे आहेत.

  1. श्रीसोमनाथ
  2. श्रीमल्लिकार्जुन
  3. श्रीमहाकाल
  4. ओंकारेश्वर
  5. श्रीभीमशंकर
  6. वैद्यनाथ
  7. त्र्यंबकेश्वर
  8. श्रीकेदारनाथ
  9. श्रीरामेश्वरम्
  10. श्रीनागेश्वर
  11. काशी विश्वनाथ
  12. श्रीघृष्णेश्वर

चला तर मग आता अजून वेळ न घालवता प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे महत्त्व आणि माहिती जाणून घेऊया. – 12 jyotirlinga Marathi


श्रीक्षेत्र सोमनाथ:-


सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये वेरावळ जवळ आहे. या मंदिराच्या जवळच त्रिवेणी घाट आहे आणि इथे हिरण्या, हिरण्या आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम होतो. अतिशय मनमोहक आणि सुंदर असलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात.

काय आहे सोमनाथ ज्योतिर्लिंगाची आख्यायिका?
प्राचीन हिंदू ग्रंथांनुसर सोम म्हणजेच चंद्राने दक्ष राजाच्या २७ कन्यांशी विवाह केला. मात्र त्याचे रोहिणीवर जास्त प्रेम होते आणि दक्ष राजाने इतर कन्यांवर अन्याय होताना पाहून त्याला शाप दिला. चंद्राने शिव शंकराची आराधना करून त्या शापाचे निराकरण करून घेतले म्हणूनच या स्थानाला सोमनाथ हे नाव पडले. हे मंदिर चंद्राने निर्माण केले असा ऋग्वेदात उल्लेख आढळतो म्हणूनच हे अत्यंत पवित्र मंदिर मानले जाते.

सोमनाथ मंदिराचा इतिहास काय?
हे मंदिर सातव्या शतकात बांधले गेले. असे मानले जाते की अकराव्या ते अठराव्या शतकापर्यंत ते अनेकवेळा तोडून पुन्हा बांधण्यात आल्याचेही सांगण्यात येते. त्याचप्रमाणे गझनीच्या मेहमूद आणि इतर लोकांनीही अनेकवेळा हे मंदिर उद्ध्वस्त करून लुटण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच ताकदीने हे मंदिर उभे राहिले.

काय आहे इथली परंपरा?
इथे चैत्र, भाद्रपद आणि कार्तिक महिन्यात पितरांचे श्राद्ध करण्याची परंपरा आहे.


श्री शैलम् मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग:- (in 12 jyotirlinga Marathi)

दक्षिणेचा कैलास याही नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर अत्यंत लोकप्रिय आहे. हे मंदिर आंध्रप्रदेश राज्यातील दक्षिणेला कृष्णा नदीच्या काठी श्री शैलम पर्वतावर आहे.

या मंदिराला मल्लिकार्जुन नाव कसे पडले?
देवी पार्वती म्हणजेच मल्लिका आणि भगवान शिव म्हणजेच अर्जुन म्हणून या स्थानाला मल्लिकार्जुन हे नाव पडले आहे.

काय आहे या मंदिराचा इतिहास?
साधारण दुसऱ्या शतकापासून हे ज्योतिर्लिंग अस्तित्वात आहे. विजयनगरचा पहिला राजा हरिहरच्या काळातील हे मंदिर असल्याचे सांगण्यात येते. या मंदिराचा मुखमंडपही याच काळातील असल्याचे समोर आले आहे.

काय आहे या मंदिराची आख्यायिका?
जेव्हा गणपती आणि कार्तिकेय यांच्यात कोण सर्वप्रथम पृथ्वीला तीन प्रदक्षिणा मारून आधी येतो अशी स्पर्धा लागली आणि श्री गणेशाने आपल्याच माता पित्यांना पृथ्वी मानून ही स्पर्धा पूर्ण केली तेव्हा कार्तिकेय चिडून कैलास पर्वत सोडून निघून गेला. त्याला प्रसन्न करण्यासाठी श्री शिव शंकर आणि माता पार्वती येथे प्रकट झाले म्हणूनच या स्थानाला मल्लिकार्जुन हे नाव पडले.

काय आहे इथली परंपरा?
श्रावणात इथे अखंड अभिषेक केला जातो तसेच शिवरात्रीला शिव – पार्वतीची मिरवणूक काढली जाते.


श्री महाकालेश्वर:- (in 12 jyotirlinga Marathi)

महाकालेश्वर हेही बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. रुद्र सागराच्या किनारी असणारे हे सुंदर मंदिर आहे. असे मानले जाते की, हे स्वयंभू आहे. हे मंदिर मध्यप्रदेशमधील उज्जैन भागात स्थित आहे. या मंदिरातील मूर्ती दक्षिणमुखी असल्याने या मूर्तीला दक्षिण मूर्ती म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात गणपती, कार्तिकेय आणि माता पार्वती यांच्याही प्रतिमा आहेत. या मंदिरात माता स्वप्नेशवरीचा वास असल्याचे मानले जाते म्हणूनच येथे येऊन केलेली पूजा स्वप्नपूर्ती करते असा समज आहे.

एवढेच नव्हे तर येथे बनवलेल्या नागचंद्रेश्वर मंदिराची दारे केवळ नागपंचमी दिवशी उघडली जातात. महाकवी कालिदास यांनीही या मंदिराची प्रशंसा केल्याचा उल्लेख आढळतो.

काय आहे यामागची आख्यायिका?
असे मानले जाते एकदा ब्रम्हा, विष्णू आणि महेश चर्चा करत बसलेले असताना शिव शंकरांना विष्णू आणि ब्रह्म देवाची परीक्षा घेण्याचा विचार मनात आला आणि त्यांनी त्यांना सांगितले मला असे ठिकाण शोधून सांगा जेथे प्रकाशाचा अंत होतो. त्यांनी त्यासाठी एक स्तंभ उभारला. विष्णूने असे कोणतेच स्थान नसल्याचे सांगितले परंतु ब्रम्हाने खोटेच आपल्याला असे स्थान सापडल्याचे सांगितले. यावर क्रोधित होऊन शिव शंकरांनी त्यांना तुम्हाला कधीच पुजले जाणार नाही असा शाप दिला. ब्रह्मदेवाने त्यांना विनंती करून त्या स्तंभात आश्रय घ्यायला सांगितला आणि त्या स्तंभाचे रूपांतर शिवलिंगात झाल्यापासून त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले.

काय आहे इथली परंपरा?
दर श्रावणी सोमवारी महाकाल आपल्या भक्तांना भेटायला बाहेर पडतात याला महाकाल सवारी म्हणतात. इथे दीर्घायुष्यासाठी तसेच रोग नाशांसाठी विशेष पूजा केली जाते.


ओंकारेश्वर:- (in 12 jyotirlinga Marathi)

हेही ज्योतिर्लिंग मध्यप्रदेशच्या उज्जैन मध्येच आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगापासून तीन – चार तासांच्या अंतरावर हे ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराची परिक्रमा संपूर्ण ओंकारेश्वर पर्वत सर केल्याशिवाय पूर्ण होत नाही.

हे देऊळ दिवसातील तीन वेळा बंद असते. सकाळी ७ ते ८ आरतीची वेळ, दुपारी १२.२० ते १.२० जेवणाची वेळ आणि संध्याकाळी ४ ते ५ ध्यानाची वेळ. असे तीन वेळा हे मंदिर बंद असते.

काय आहे या मंदिराची आख्यायिका?
या मंदिरात कुबेराने तपश्चर्या करून शिव लिंगाची स्थापना केली आणि कुबेराच्या स्नानासाठी शंकराने स्वतःच्या जटेतून कावेरी नदी उत्पन्न केली अशी आख्यायिका आहे. इथे नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम पाहायला मिळतो.

काय आहे इथली परंपरा?
पहाटे चार वाजल्यापासून पूजा, अभिषेक आणि कुबेर महालक्ष्मीचा यज्ञ केला जातो. इथे अभिषेकासाठी फक्त नर्मदा नदीच्या पाण्याचा वापर केला जातो तसेच धनत्रयोदशीच्या रात्री देवाला ज्वारी अर्पण केली जाते.


केदारनाथ:- (in 12 jyotirlinga Marathi)

सर्वात सुंदर आणि मनमोहक मानले जाणारे ज्योतिर्लिंग म्हणजे केदारनाथ. समुद्रसपाटीपासून ३५८३ मीटर उंचीवर असलेले हे मंदिर उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग या जिल्ह्यात असून हिमालय पर्वतरांगांच्या मंदाकिनी नदीच्या किनारी बर्फाच्छादित शिखरांवर वसले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ हे सर्वात उंचीवर असलेले ज्योतिर्लिंग आहे. हे दुर्गम भागात असूनही भाविकांची इथे गर्दी असते. असे मानले जाते या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने स्वर्गाची दारे खुली होतात.

काय आहे याची आख्यायिका?
कौरव आणि पांडवांमध्ये जेव्हा कुरुक्षेत्र येथे युद्ध झाले तेव्हा पांडवांचा विजय झाला परंतु आपल्याच भावंडांना हरवल्याने ते स्वतःला दोषी मानत होते. या पापातून मुक्त होण्यासाठी पांडव शिवाची तपश्चर्या करण्यासाठी काशीला गेले. तेथून त्यांना हिमालयात जाण्याची आज्ञा मिळाली आणि ते हिमालय पर्वतावर आले. भगवान शिव शंकर त्यांना सहजासाजी पापमुक्त करणार नव्हते. त्यांनी एका महिशीचे अर्थात म्हशीचे रूप घेतले आणि ते गुप्त काशी येथे गेले. वेगळीच दिसणारी म्हैस पाहून भीमाने तिची शेपटी धरली. त्याच्या शक्तीपुढे त्या म्हशीचे तुकडे झाले आणि पाच जागांवर पडले. ते पंच केदार म्हणून ओळखले जातात. तिच्या पाठीचा भाग केदारनाथ येथे पडला आणि केदारनाथची निर्मिती झाली असे म्हणले जाते. या नंतर भगवान शिवाने पांडवांना पाप मुक्त केले आणि केदारनाथ येथे निवास करण्याचा निश्चय केला.

काय आहे इथली परंपरा?
इथल्या मंदिराचे दरवाजे मे ते नोव्हेंबर असे सहा महिने उघडे असतात तर इतर सहा महिने बंद असतात. या सहा महिन्यात शिवलिंगाजवळ सतत दिवा तेवत असतो.


श्रीक्षेत्र भीमाशंकर:- (in 12 jyotirlinga Marathi)

भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. भीमाशंकर हे पर्यटनाच्या रूपातून अधिक नावारूपाला आले आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्य नद्यांपैकी एक भीमा नदीचा उगम होतो. हे ज्योतिर्लिंग घनदाट जंगलाने वेढलेले असून १९८४ साली भीमाशंकर हे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.

काय आहे याची आख्यायिका?
कुंभकर्णाच्या वधानंतर त्याच्या पत्नीने आपला पुत्र भीमा याला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. भीमा मोठा झाल्यावर त्याला तिने कुंभकर्णाच्या वधाचे सांगितले आणि आपल्या पित्याचा बदला घेण्याची आग भीमाच्या मनात लागली. देवतांचा बदला घेण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून सर्वात बलशाली होण्याचे वरदान मागून घेतले. एकदा असेच जाताजाता त्याने राजा कामरूपेश्वराला त्याने महादेवाची आराधना करताना पाहिले आणि संतापून त्याने राजाला महादेवाची भक्ती सोडून स्वतःची भक्ती करण्यासाठी सांगितले. राजाने याला ठाम नकार देताच त्याने राजाला बंदी केले. कारागृहात राजाने मनोभावे शिवलिंग बनवले आणि त्याची पूजा तो करू लागला. ही बातमी भीमाला समजताच त्याने रागात तलवारीने ते शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर त्यातून स्वतः महादेव प्रकट झाले आणि त्यांनी भीमाचा वध केला. राजाने श्री शिव शंकरांना तेथेच राहण्याची विनंती केली आणि महादेवाने त्या स्थानावर भीमाचा वध केल्याने त्या स्थानाला भीमाशंकर हे नामानिधान प्राप्त झाले.

काय आहे इथला इतिहास?
१२०० ते १४०० वर्षांपूर्वी बांधलेले हे मंदिर हेमाडपंथी आहे. असे मानले जाते तिथे स्वतः छ्त्रपती शिवाजी महाराज दर्शनासाठी जात असत. मात्र आता तेथे नवीन बांधकाम करून आधुनिक कॅमेऱ्याच्या मदतीने संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येते.

काय आहे इथली परंपरा?
इथल्या शिवलिंगाचा आकार मोठा असल्याने येथील शिवलिंगाला मोटेश्वर म्हणून पुजले जाते.


काशी विश्वनाथ:- (in 12 jyotirlinga Marathi)

उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात हे मंदिर स्थित आहे. या शहरात साधारण १६५४ मंदिरे आहेत म्हणून या शहराला मंदिरांचे शहर असेही म्हणले जाते. परंतु काशी विश्वनाथ हे प्रमुख मंदिर मानले जाते. काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्याआधी धुंडीराज आणि ढुंढीराज विनायकाचे दर्शन घेण्याची रीत आहे. या मंदिराचा एक इतिहास आहे. सर्वात क्रूर आणि आक्रमक मानल्या जाणाऱ्या कुल्बउद्दिन ऐबक याने हे मंदिर तोडून तेथे मशजिद बांधली होती. अकबराच्या काळात तोरडमलांनी मंदिराचे पुनर्निर्माण केले. मात्र औरंगजेबाच्या काळात पुन्हा हे मंदिर तोडण्यात आले. पुन्हा अहिल्याबाई होळकरांनी हे मंदिर बांधून त्याचा जीर्णोद्धार केला.

काय आहे याची आख्यायिका?
कैलासावर अगदी साधेपणाने भस्म फासून राहणाऱ्या शिव शंकराची सगळेच टिंगल करत म्हणून पार्वतीने हट्ट धरला मला अश्या ठिकाणी घेऊन जा जिथे कोणीच असे टिंगल करणार नाही म्हणून तिला घेऊन शिव शंकर वाराणसीमध्ये राहू लागले.

काय आहे इथली परंपरा?
यदुवंशी लोक मन मंदिर घाटातून गंगाजल घेऊन काशी विश्वनाथाचा अभिषेक करतात. साधारण ९० वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.


त्र्यंबकेश्वर:- (in 12 jyotirlinga Marathi)

गोदावरी नदीचे उगम स्थान असणाऱ्या त्र्यंबकेश्वर स्थानावर हे मंदिर स्थित आहे. नाशिक पासून अंदाजे २८ किमी अंतरावर हे आहे. या मंदिराचा अत्यंत सुंदर दृश्य असलेला आजूबाजूचा परिसर खूपच नयनरम्य आहे. या मंदिराला चार दरवाजे आहेत. तीन दरवाजे भक्तांसाठी खुले असतात तर पश्चिमेकडील दरवाजा फक्त विशेष कार्यासाठीच उघडला जातो. हे मंदिर कालसर्प पूजेसाठी तसेच श्राद्ध विधींसाठी प्रसिद्ध आहे.

काय आहे या मंदिराचा इतिहास?
सन १७४० ते १७६० या काळात तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव यांनी जुन्या मंदिराच्या जागी बांधले आहे. हे पुरातन काळातील बांधकाम असून काळया शिळेपासून संपूर्ण बांधकाम केलेले आहे. या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे. ते शिवलिंग आपल्या डोळ्यांच्या आकाराचे दिसतात. पाणीदार डोळ्यात लक्षपूर्वक पाहिल्यास तीन शिवलिंग दिसतात जे ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचा अवतार मानले जाते.

काय आहे या मंदिराची आख्यायिका?
हे स्थळ प्राचीन काळी त्र्यंबक ऋषींची तपोभूमी होती. गौतम ऋषींनी गो हत्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी येथे कठोर तपश्चर्या केली आणि शिव शंकरांना गंगा नदी नाशिक मध्ये आणण्याचे वरदान मागितले. त्या वरदानामुळे येथे गंगा नदी अर्थात गोदावरी नदीचा उगम झाला आणि त्या गोदावरी नदीच्या उगमासोबत शिव शंकरांनी आपल्या वास्तव्यास होकार दिला आणि हे त्र्यंबक ऋषींचे स्थान असल्याने या ज्योतिर्लिंगाला त्र्यंबकेश्वर हे नाव पडले.

काय आहे इथली परंपरा?
इथे कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पूजा केली जाते. दर श्रावणी सोमवारी शिवाची पालखी काढली जाते.


वैद्यनाथ:- (in 12 jyotirlinga Marathi)

भारताच्या बीड जिल्ह्यातील परळी येथे वैद्यनाथ अर्थात परळी वैजनाथ हे मंदिर आहे. झारखंड मधील संथाल परगण्यातील गावात अजून एक मंदिर आहे तेही १२ ज्योतिर्लिंगातील एक आहे असे मानण्यात येते. बीड जिल्ह्यातील हे वैद्यनाथ मंदिर जागृत देवस्थान असल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या परिसरात तीन कुंडे आहेत. इतर कोणत्याही ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात कोणत्याही ज्योतिर्लिंगाला हात लावता येत नाही परंतु वैद्यनाथ येथील ज्योतिर्लिंगाला हात लाऊन नमस्कार करता येतो.

काय आहे वैद्यनाथ मंदिराचा इतिहास?
श्रीकरणादिप हेमाद्रीने यादवांच्या काळात हे मंदिर बांधले तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे सांगण्यात येते.

काय आहे मंदिराची आख्यायिका?
असे म्हणतात रावणाच्या हातून अचानकच या ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली. रावण शिवलिंग घेऊन जात असताना या जागी शिवलिंग खाली ठेवल्याने इथे हे स्वयंभू ज्योतिर्लिंग निर्माण झाले असे सांगण्यात येते.

काय आहे इथली परंपरा?
फक्त आणि फक्त याच देवळात ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून दर्शन घेता येते. या मंदिराचा गाभारा आणि सभामंडप एकाच पातळीवर असल्याने सभामंडपातून देखील ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते.


नागेश्वर:- (in 12 jyotirlinga Marathi)

गुजराथ मधील द्वारका येथे हे मंदिर स्थित आहे. नागेश्वर अर्थातच नागांचा ईश्वर म्हणून याचे नाव नागेश्वर. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे.

काय आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगाची आख्यायिका?
शिवपुराणानुसार नागेश्वर ज्योतिर्लिंग दुक्रनाव अर्थातच दारुकवन येथे आहे. असे म्हणले जाते दारुका ने सुप्रिया नावाच्या एका शिव भक्तावर आक्रमण करून दारुकवन येथे तिला बंदिस्त केले. तिच्या सोबत आणखी कैदी होते ज्यांना त्याने त्याच्या राज्यातील समुद्रात राक्षसांच्या मध्ये टाकून दिले. सुप्रियाने इतर कैद्यांसोबत मिळून मनापासून शिव शंकरांचे नामस्मरण सुरू केले. त्याला प्रसन्न होऊन शिव शंकरांनी स्वतः त्या राक्षसांना पराभूत केले आणि त्या स्थानावर ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थापित झाले.

काय आहे इथली परंपरा?
इथे शिवासोबत नागाची पूजा केली जाते. पुरुषांना गर्भगृहात फक्त धोतर नेसून पूजा करण्याची परवानगी असते.


रामेश्वरम् तीर्थ:-(in 12 jyotirlinga Marathi)

हे चारधाम यात्रेपैकी एक असणारे अत्यंत सुंदर मंदिर आहे. हे मंदिर तामिळनाडूमध्ये स्थित आहे. उत्तरप्रदेशातील काशीला जी मान्यता आहे तीच दक्षिण भारतात या रामेश्वरम् ला आहे. हे मंदिर शंखाच्या आकाराचे असून हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांनी वेढलेले एक सुंदर मंदिर आहे. हे मंदिर एका उत्तम कलेचे उदाहरण आहे. याचे प्रवेशद्वार चाळीस फूट उंच आहे. या मंदिरात अनेक खांब आहेत. हे खांब एक सारखे दिसणारे असले तरी जवळ जाऊन पाहिल्यास प्रत्येक खांबावर वेगवेगळी नक्षी असल्याचे समजते.

काय आहे आख्यायिका?
श्री राम लंकेला युद्धासाठी जाण्याआधी त्यांनी या समुद्रकिनाऱ्यावर शिवलिंग बनवून त्याची पूजा केली होती. रावणाचा वध केल्यानंतर देखील त्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी श्री राम पुन्हा येथे आले होते. श्री रामाने स्थापन केलेले शिवलिंग म्हणून या स्थानाला रामेश्वरम् नामानिधान प्राप्त झाले.

काय आहे इथली परंपरा?
हरिद्वार मधून आणलेले गंगा जल या शिवलिंगावर अर्पण करण्याची परंपरा आहे.


घृष्णेश्वर:- (in 12 jyotirlinga Marathi)

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील हे मंदिर दौलताबादपासून ११ किमी अंतरावर वेरूळ लेण्यांजवळ स्थित आहे. घृष्णेश्वर हे प्राचीन मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम लाल दगडांचे आहे आणि त्यावरील नक्षी काम खूपच सुंदर आहे. रामायण, महाभारत, शिवपुराण, स्कंदपुराण यांसारख्या ग्रंथात या मंदिराचा उल्लेख आढळतो.

काय आहे यामागची आख्यायिका?
घृष्णा आणि सुदेहा या दोघी सख्ख्या बहिणी आणि सख्ख्या सवती होत्या. दोघींचा विवाह एकाच माणसाशी झाला होता आणि दोघींनाही मूलबाळ नव्हते. घृष्णा शिवभक्त होती. भोळ्या महादेवाच्या कृपेनेच तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. घृष्णेला पुत्र झाल्यामुळे सुदेहा तिचा मत्सर करू लागली. एकेदिवशी तिने तिच्या पुत्राला मारून नदीत फेकले. नदीकिनारी घृष्णा शिवपूजा करत होती. तिला हे सर्व समजले पण तिचा तिच्या महादेवावर पूर्ण विश्वास होता. ज्याने आपल्याला हा पुत्र दिला आहे तोच त्याचे रक्षण करेल या ठाम विश्वासाने ती पुजेतून उठली नाही. शिव शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिच्या पुत्राला जिवंत केले. तिचा पुत्र नदीतून जिवंत बाहेर आला आणि त्याने आपल्या आईला सुदेहाला क्षमा कर असे सांगितले. घृष्णेने शिव शंकरांना इथेच वास्तव करा अशी प्रार्थना केली आणि शंकरांनी ती मान्य केली. तेव्हापासून तिथे शंकराचे वास्तव्य आहे आणि घृष्णेच्या नावामुळे या ठिकाणाला घृष्णेश्वर हे नाव प्राप्त झाले.

काय आहे इथली परंपरा?
या मंदिरात १०१ शिवलिंगे बनवून त्याची पूजा करण्याची परंपरा आहे. १०१ परिक्रमा पूर्ण केल्या जातात आणि बाजूलाच असलेल्या शिवालय सरोवराचे दर्शन घेण्याची परंपरा इथे आहे.


ही होती संपूर्ण १२ ज्योतिर्लिंगांची (12 jyotirlinga Marathi) माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा.

2 thoughts on “भारतातील बारा ज्योतिर्लिंग ची माहिती वाचा सविस्तर मराठीमध्ये -12 jyotirlinga Marathi”

Leave a Reply